नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने खंडेश्वरी देवी संस्थानच्या वतिने जय्यत तयारी
मंदिर परिसरात राहणार 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
–
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : नवरात्र उत्सव म्हटले की, बीडकरांना वेध लागतात ते बीड शहरातील खंडेश्वरी देवीचे. नऊ दिवसांचा उपवास करुन भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी जातात. परंतू हा उत्सव कोरोनामुळे गेल्या तीन वर्षापासून होऊ शकला नव्हता. परंतू यावर्षी मात्र निर्बंध मुक्त ही यात्रा भरणार असून यात्रेच्या अनुषंगाने खंडेश्वरी देवी संस्थानच्या वतिने जय्यत तयारी सुरु करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीच्या अनुषंगाने यावर्षी मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती खंडेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष राणा रणजितसिंह चौव्हाण यांनी दिली.
बीड शहरातील खंडेश्वरी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकर यांनी केला होता. त्यापूर्वी देखील मंदिर अस्तित्वात होते, जागृत देवस्थान असलेल्या खंडेश्वरी देवी संदर्भात आख्यायिका सांगितली जाते. एका मेंढपाळाने रेणुका मातेची मनोभावे पूजा केली, त्यामुळे प्रसन्न झालेल्या रेणुकामातेने वर माग म्हणून सांगितले, तेव्हा देवी तू माझ्या सोबत चल असं मेंढपाळ म्हणाला. मात्र मी तुझ्या पाठीमागे येते पण तू परत फिरून पाहायचं नाही. ज्या ठिकाणी तू परत फिरून पाहशील त्याच ठिकाणी मी राहील, असं मेंढपाळाला वचन दिलं. मेंढपाळ चालत असताना देवी खरच आपल्या पाठीमागे आली का ? हे पाहण्यासाठी त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा वचनाचा भंग केला म्हणून देवी बीड शहराच्या उत्तरेस, त्याच ठिकाणी थांबली. देवीच रूप हे तांदूळ मय आहे. वचनभंग झालं आणि सेवेत खंड पडला म्हणून खंडेश्वरी असं नाव रुढ झालं. तेव्हापासून रेणुका मातेच जागृत ठाण निर्माण झालं. सुरुवातीला मंदिर लहान होतं, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून मंदिर समिती आणि भाविक भक्तांच्या देणगी मधून आज मोठ्या प्रमाणात मंदिराचा विकास झाला आहे. याच ठिकाणी नवरात्र मध्ये मोठी यात्रा भरते. परंतू कोव्हीडच्या अनुषंगाने 2019, 2020 मध्ये ही यात्रा पुर्ण रद्द करण्यात आली होती. 2021 मध्ये यात्रा रद्द होती परंतू भाविकांना दर्शन घेण्यासाठी मुभा देण्यात आली होती. यंदा कोव्हीडची परस्थिती आटोक्यात असल्यामुळे यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होणार आहे. खंडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टच्या वतिने चोक नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षापासून खंडेश्वरी यात्रा रद्द होती. परंतु यावेळेस कोव्हीड आटोक्यात आल्यामुळे निर्बंध मुक्त खंडेश्वरी यात्रा होणार आहे. यात्रेच्या अनुषंगाने मंदिर परिसरात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मंदिर ट्रस्टच्या वतिने यात्रेचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. राणा रणजितसिंह चौव्हाण, खंडेश्वरी देवी ट्रस्ट अध्यक्ष बीड