नवनाथ शिराळेंची सरकारकडे मागणी ..!
बीड प्रतिनिधीड : नगरपालिकेचा क्षीरसगरांनी राजकीय अड्डा करून टाकला. नागरिकांना सेवा देण्याऐवजी खिशात मेवा भरण्याचे काम केले. केवळ स्वार्थी धोरणामुळे शहराची दयनीय अवस्था झाली असून, नागरिक अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. आज पालिकेवर शासनाचा प्रशासक असला तरी, कारभारात कोणताही बदल झाला नाही. किमान स्वच्छता, नियमित पाणी, लाईट यासारख्या किमान गरजा पुरवल्या पाहिजेत परंतु प्रशासक आणि सिओ हुजरेगिरी करत कागदोपत्रीच काम करत आहेत. एसडीओ हा प्रशासनातला सक्षम अधिकारी यांचेकडून कर्तव्याची अपेक्षा असताना आज ते नंदी बैलांची भूमिका निभावत आहेत. असंवेदनशील व कर्तव्य शून्य प्रशासाकामुळे नागरिकांचे बेहाल थांबवण्यासाठी सरकारने तातडीने बीड नगरपालिकेसाठी कर्तव्यनिष्ठ व खमक्या प्रशासक द्यावा. अशी मागणी माजी सभापती तथा भाजपा जिल्हा सचिव नवनाथ शिराळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचाकडे लेख निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नमूद केले आहे की,बीड नगर परिषदेवर गेली पाच – सहा महिण्यापासून प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी ( SDM ) श्री नामदेव टिळेकर यांची शासनाने नेमणूक केलेली आहे. प्रशासक म्हणून त्यांनी अद्याप जबाबदारीने नगरपरिषद प्रशासनाकडे लक्ष दिलेले नाही.
बीड शहराची अत्यंत दयनीय अवस्था असून, नागरिकांचे हाल चालू आहेत. शहरात अस्वच्छतेमुळे बकाल अवस्था निर्माण झाली. रस्त्यावरील खड्डे , साचलेले पावसाचे पाणी, यामुळे रहदारीला त्रास होत आहे. अस्वच्छतेमुळे सर्वत्र डासांचे थैमान असून, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील बहुतांश भागातील पथदिवे बंद पडले असून, मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेली पंचवीस वर्षापासून शहराला पंधरा दिवसाला पाणी मिळते. या गंभीर प्रश्नाची सोडवणूक, प्रशासकामार्फत होईल अशी भावना सुजाण नागरिकांची होती.
परंतु दुर्दैवाने भ्रष्ट सत्ताधारी यांचे जागेवर शासनाचा प्रशासक व मुख्याधिकारी असूनही नागरिकांना कोणतीच मुलभूत सुविधा अपेक्षे प्रमाणे मिळत नाही. हे नागरिकांचे दुर्भाग्य आहे.
राज्यातील कर्तव्यनिष्ठ सरकार लोकहिताचे काम करत असताना, बीड नगरपालिकेला, प्रशासन, प्रशासक आणि सीओ मात्र निष्क्रिय लाभले आहेत. कर्तव्याची जाणीव त्यांच्या कडे नाही. दिन जाव पगार आव या भावनेतून कारभार हाकत आहेत.मागील सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले होऊन अधिकारी त्यांची हुजरेगिरी करत आहेत. राज्यात शिंदे – फडणवीसांचे सरकार असूनही येथील अधिकार्यांना विरोधकांचाच पुळका येतो. व त्यांना सकारात्मक साथ देत नगरपालिकेच्या कारभाराचा खेळ खंडोबा चालू आहे. प्रशासक म्हणून नामदेव टिळेकर पूर्णतः कर्तव्य शून्य व निष्क्रिय ठरले आहेत.
बीड नगरपालिकेचा कारभार पारदर्शक सुनियोजित चालवून नागरिकांना किमान मुलभूत सुविधा प्राप्त करून देण्यासाठी कर्तवनिष्ठ व खमक्या प्रसासाकाची नितांत गरज आहे.
कृपया बीड शहराच्या त्रस्त नागरिकांची भावना व मागणी लक्षात घेऊन तातडीने नवीन प्रशासक नेमावा अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.