शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा
बीड : जिल्ह्यात अचानक पावसाने दांडी मारल्याने जोमात आलेली शेतकऱ्यांची पिके पावसा अभावी करपू लागली . कापूस, तूर, सोयाबीन, मका , उडीद, मूग, सूर्यफूल ही पिके वाया गेली . शेतकरी हतबल झाला . शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळण्यासाठी बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा यासंबंधीचे निवेदन शिवसंग्रामचे नेते रामहरी भैय्या मेटे व शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले .
यंदाच्या वर्षी आघूट मोहरली व सात जूनच्या पूर्वीच बहुतांशी ठिकाणी पाऊस झाला . शेतकरी आनंदी झाला यंदा चांगला पाऊस आहे त्यामुळे यावर्षी पिके चांगली येतील चार पैसा हातात येईल . दोन वर्ष आधीच कोरोनामध्ये शेतकऱ्याचा कंबरडे मोडले होते . दैनंदिन गरजा भागवण्यातच तो मेटाकुटीला आला होता . अशातच काळाने घाला घातला आणि अचानक पिकांना पावसाची अत्यंत गरज असताना पावसाने हुलकावणी दिली . जोमात आलेली पिके माना टाकू लागली . डोळे देखत पिके करपू लागली . तळहातातल्या फोडाप्रमाणे पिके सांभाळली अहोरात्र कष्ट केलं . कपाशीला बोंड लागण्याचा काळ, सोयाबीन फुलोऱ्यात आली होती . अशातच सर्व स्वप्नावर पाणी फिरलं आणि शेतकऱ्याला डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली परंतु मायबाप सरकारना शेतकऱ्यांना लवकर मदत जाहीर करून मानसिक आधार देण्याची गरज आहे .
सध्या पावसाची खूपच गरज होती परंतु पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची पिके डोळ्यादेखत करपू लागली . एवढी मेहनत करून ही सर्व पिके डोळ्या देखत जात असल्याने शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. पेरणी, खुरपणी, खत, बी – बियाणे एवढा मोठा खर्च केला . पोटच्या लेकराप्रमाणे पिकाची काळजी घेतली . परंतू ही सर्व पिकं डोळ्यादेखत जळून जात आहेत . या हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळणे गरजेचे आहे .अन्यथा बीड जिल्ह्यात पुन्हा शेतकरी आत्महत्याचे प्रकरणे होऊ नयेत यासाठी सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी यासाठी शिवसंग्रामचे युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी बीड यांची भेट घेत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची विनंती केली . अशी मागणी शिवसंग्रामच्या वतीने करण्यात आली .याप्रसंगी शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे,नेकनूर जि.प गटप्रमुख विनोद कवडे,माजी सभापती ज्ञानेश्वर कोकाटे,ऊसतोड कामगार नेते तथा पंचायत समिती सदस्य बबनराव माने,शिरूर कासार तालुकाप्रमुख माऊली शिंदे,शिरूर तालुका उपाध्यक्ष नामदेव धांडे,ओबीसी आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष शिवराम राऊत,शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे,सोशल मीडियाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा पंडित शेंडगे,युवक आघाडीचे दत्ता जाधव,शिवसंग्राम शिरूर तालुका संघटक महादेव बहिर,शिरूर तालुका सरचिटणीस कृष्णा परजने,योगेश जाधव,विजय सुपेकर,विश्वास बहिरवाळ व अन्य शिवसंग्राम पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते