बीड/प्रतिनिधी : येत्या दोन वर्षात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात यावीत यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण विभागाने तयारी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत बीडमध्येही अद्यावत शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे अशी मागणी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर हे गेल्या दोन वर्षांपासून करत होते,केंद्र आणि राज्य सरकारच्या सहभागातून प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज व्हावे असा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता,त्यांनतर तत्कालीन मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केला तेव्हाच शासनाच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांच्याकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता
आज वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रकल्पांना आशियाई विकास बॅंकेमार्फत (एशियन डेव्हल्पमेंट बँक) वित्त सहाय्य आणि आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थे(इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशन)सोबतची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिश महाजन, मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, वित्तचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, केंद्र शासनाच्या क्षमता बांधणी आयोगाचे सदस्य तथा प्रशासक प्रवीणसिंह परदेशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वित्त व नियोजन विभागाच्या सचिव शैला ए., वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव श्रीकर परदेशी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे आणि इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले की, वैद्यकीय सुविधा निर्मितीसाठी सन 2030 पर्यंतचा आराखडा विभागाने तयार केला आहे.
यानुसार पहिल्या टप्प्यात वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारी धोरण आणले आहे. यानुसार इंटरनॅशनल फायनान्सिंग कॉर्पोरेशनच्या मदतीने प्राथमिक टप्प्यात नागपूर येथे सुपरस्पेशलिटी, तसेच संभाजीनगर आणि लातूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे.प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय रुग्णालय उभारण्यावर भर देऊन वैद्यकीय सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध करणे आणि शिक्षण तसेच कौशल्य प्रशिक्षण यांच्या आधारे सक्षम मानवी संसाधनाची उपलब्धता सुधारणे यावर येत्या काळात भर देण्यात येणार आहे त्यामुळे बीडमध्ये स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा मार्ग सुकर झाला आहे यासाठी आणखी जे जे प्रयत्न करता येतील ते आपण करू असे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सांगितले