पाच दिवसाला पाणी सोडू क्षीरसागरांची वल्गना ..!
बीड प्रतिनिधी : बीड नगर परिषदेवर प्रशासक येऊन दोन महिन्या पेक्षा जास्त कालावधी झाला. परंतु प्रशासकांना अद्याप कर्तव्याची जाग आली नाही. गेली वीस वर्षापासून शहराला दहा ते पंधरा दिवसाला पिण्याचे पाणी पुरवले जाते. कोट्यावधी रुपयांची केंद्र शासनाने अमृत अटल योजना दिली. परंतु, क्षीरसागर कुटुंबाला अद्याप पाण्याचा सुरळीत पुरवठा करता आला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकांची दिशाभूल करण्यासाठी काल पाच दिवसाला शहराला पाणीपुरवठा करू अशी वल्गना डॉ. क्षीरसागरांनी केली. आज नगरपालिकेचा प्रशासनात आणि कारभारात कोणताही वैधानिक अधिकार नसताना घोषणा करणारे टिकोजिराव कोण असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ शिराळे यांनी उपस्थित केला आहे.
डॉ.क्षीरसागर यांच्या आई वडिलांनी बीड नगरपालिकाचा कारभार चालवला. कारभाराच्या प्रदीर्घ कालावधीत बीडकरांना नियमित पिण्याचे पाणी दिले नाही. अथवा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. सण, उत्सवाच्या काळातही जनतेला पाणी देण्याचे पुण्य यांच्या हातून चुकूनही घडले नाही. नगरपालिकेतून संपत्तीचा मलिदा काढण्यात यांनी पूर्ण डोके लावले. शहराच्या आणि नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष केले. भकास आणि उदास शहर करण्याचे पाप यांनी केले. काल डॉ. क्षीरसागर यांनी पाच दिवसाला पाणी सोडू अशी घोषणा करून नगरपालिकेच्या कारभारात राजकीय हेतूने लूडबुड केली आहे. ज्या दिवशी नगरपालिकेवर प्रशासक नेमला त्या क्षणापासून नगराध्यक्ष ते नगरसेवक सर्वांचे वैधानिक अधिकारी संपुष्टात आले. स्वीकृत सदस्य डॉ. क्षीरसागर यांचा कोणत्याच अर्थाने प्रशासनास हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सत्तेच्या लालसेने डॉ क्षीरसागरांची लुडबुड प्रशासक व मुख्याधिकारी यांना दिसत नाही. प्रशासक आणि मुख्याधिकारी डॉ. क्षीरसागरांचे बटिक झाले असतील तर हि चिंतेची बाब आहे. यापूर्वी प्रशासकांना सूचना करूनही त्यांनी अद्याप गांभीर्याने दखल घेतलेली नाही. हि प्रशासकीय अधिकाऱ्यांची कर्तव्यातील कसूर आहे. याची दखल जरूर घेतली जाईल. वैधानिक अधिकार नसताना नगरपालिकेतील कारभारात ढवळाढवळ करणाऱ्या टिकोजीरावांचा हस्तक्षेप प्रशासकाने तातडीने थांबवावा अन्यथा प्रशासक आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधात शासनाकडे तक्रार करून त्यांना योग्य जागा दाखवली जाईल. असा इशारा नवनाथ शिराळे यांनी दिला असून, हिंदू बांधवांचे आगामी सण उत्सव लक्षात घेऊन प्रशासक व मुख्याधिकारी नगरपरिषदेने बीड शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी रस्त्यावर यावे. अशी मागणी भाजपा नेते तथा माजी न.प. सभापती नवनाथ शिराळे यांनी केली आहे.