रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करा – मुख्यमंत्री
तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रस्त्यांच्या विविध प्रकल्पांना गती देण्यासाठी या कामांची वर्गवारी करुन कमी, मध्यम मुदतीचे रस्ते प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. जनतेला तात्काळ दिलासा देण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल, महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे शहर पोलीस आयुक्त जय जीत सिंह यांचेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरार महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, रायगड, पालघरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुख्य गोदामे, लॉजिस्टिक्स केंद्रे, कंटेनर-ट्रक टर्मिनल्समुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ज्या भागात वाहनांची जास्त रहदारी असल्याने वाहतूक कोंडी होते, त्या भागातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी रस्ते आणि अनुषंगिक प्रकल्पांना गती द्यावी, नव्या प्रकल्पांचे सविस्तर प्रकल्प अहवाल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.
*रस्ते प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होणार*
वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉरमुळे भिवंडी-कल्याण- डोंबिवली-उल्हासनगर या भागातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून त्याबरोबरच त्या भागाच्या विकासाला देखील चालना मिळणार आहे, त्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.
आनंदनगर टोल नाका ते साकेत मार्ग, कोपरी-पटणी पूल, तीन हात नाका मार्गाची पुनर्बांधणी, भिवंडी जोडणारा पूल, ठाणे कोस्टल मार्ग, ऐरोली बोगदा ते काटई नाका मार्ग हे प्रकल्प जलदगतीने करण्यात येणार असून या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
*चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार*
चिंचोटी ते अंजूर फाटा मार्गामुळे ठाण्यातील वाहतूकीचे विभाजन होऊन ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. या मार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून त्यांनी हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या. शीळ फाटा ते मानकोली, कल्याण ते बापगाव, कल्याण ते टिटवाळा, कल्याण ते पडघा, टिटवाळा ते बदलापूर हे रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण, डोंबिवली, ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
*पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर*
पालघर जिल्ह्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणावर विशेष भर दिल्यास दळणवळणाच्या अंतर्गत सुविधा विकसित होणार आहेत, त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या उद्योग-व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला. मुरबे-पालघर रस्त्यामुळे पालघरजवळील दापोलीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेत बचत होईल आणि ३५ कि.मी. चे अंतर कमी होईल. विश्वभारती फाटा- भिनार-वडपा मार्गाचे काम देखील मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणाने करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या.
*शीळफाटा-भिवंडी रस्त्याच्या मोबदल्याचा विषय मार्गी लावण्याचे निर्देश*
शीळफाटा-कल्याण-भिवंडी रस्त्याच्या भूसंपादनापोटी देण्यात येणाऱ्या मोबदल्याचा विषय प्रलंबित असून तो तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हा प्रशासनाला दिले. सर्व्हिस रोड- राजनोली ते दुर्गाडी मार्गावरील अनधिकृत बांधकामे हटविण्याबरोबरच तेथील विस्थापितांसाठी ठाण्याच्या धर्तीवर पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
*नियमबाह्य गतिरोधक काढून नियमांची अंमलबजावणी करा- मुख्यमंत्री*
बदलापूर मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक करण्यात आले असून हे नियमबाह्य गतिरोधक तातडीने काढण्यासाठी नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणांना गतिरोधकांसंदर्भातील नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.