आषाढी वारीतुन एसटी विभागाला 81 लाखाचे उत्पन्न
धारुर आगाराचे सर्वात जास्त उत्पन्न; गेवराई आगार उत्पन्नात दोन नंबरवर
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाद्वारे आषाढी वारी निमित्त पंढरपूर यात्रेसाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली होती. या यात्रेतून बीड विभागाला 81 लाख 29 हजार 165 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोव्हीड मध्ये बस विभागाचे मोठे नुकसान झाले होते. परंतु आषाढी वारी एकप्रकारे बस विभागावर पावलीच म्हणावे लागेल. आषाढी वारीनिमित्त बीड जिल्ह्यातून 150 बसेस सोडण्यात आल्या होत्या. याबसेसचा जिल्ह्यातील 89 हजार भाविकांनी लाभ घेतला. 2019 च्या आषाढी वारीच्या तुलनेत यंदाची आषाढी वारी बीड विभागाला पावली.
दोन वर्षांपासून कोरोनामुळे पंढरीची वारी बंद होती. त्यामुळे वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ शकले नाही. मात्र, यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने पंढरीची वारीला लाखो भाविक गेले होते. या पंढरीच्या वारीसाठी बीड जिल्ह्यातून 150 विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. या बसेसने एकूण 960 फेऱ्या पुर्ण करत भाविकांना सेवा दिली. यातून बीड विभागाला एकूण 81 लाख, 29 हजार, 165 रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात धारुर विभागात सर्व विभागात जास्त उत्पन्न मिळवणार विभाग ठरला तर गेवराई विभाग दोन नंबरवर आला. 2019 मध्ये आषाढीवारीतुन बीड विभागाला 64 लाख, 80 हजाराचे उत्पन्न मिळाले हाते. त्या तुलनेत यंदा बीड विभागाला जास्त उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाचे दोन वर्ष सामान्य लालपरी आगारात बंद होती. त्यानंतर एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर गेल्याने अनेक महिने कोरोना आटोक्यात आल्यानंतर बससेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. तर कोरोनामुळे दोन वर्ष भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पंढरपुरात पोहोचून विठुरायाचे दर्शन घेण्याच्या सुखापासून त्यांना वंचित रहावे लागले, मात्र कोरोना संसर्गाचा धोका आटोक्यात आल्याने यंदा पालखी सोहळ्याला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर अनेकांना वारीतून चालत जाणे शक्य नसल्याने अनेक वारकरी बसने विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले.
कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून आषाढी पंढरपूर यात्रा झालेली नव्हती. यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकानी राप बसणे पंढरपूर करिता प्रवास केला . त्यामुळे समाधानकारक उत्पन्न प्राप्त झाले. प्रवाशांनी रा. प.बस ने प्रवास करावा असे आवाहन श्री अजय कुमार मोरे विभाग नियंत्रक बीड यांच्यातर्फे करण्यात येत आहे.