दिल्ली : उद्धव ठाकरे आम्हाला भेटत नाहीत, वर्षा आणि मातोश्रीवर आम्हाला प्रवेश मिळत नाही, उद्धव ठाकरे आमच्याशी फोनवरही बोलत नाहीत, अशी कारणं देत भाजपसोबत गेलेल्या शिवसेनेतील बंडखोरांच्या नशीबी ताटकळत राहण्याचा शाप कायम असल्याचे दिसून आले आहे. कारण, दिल्लीत बंडखोर गटाचे नेतृत्त्व करत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच भाजप नेतृत्त्वाची भेट घेण्यासाठी तब्बल 12 तास वाट पाहावी लागल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून सोमवारी मध्यरात्री दिल्लीत दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारची दुपार उलटून गेली तरी भाजपश्रेष्ठींना भेटू शकले नव्हते. ते नवीन महाराष्ट्र सदनाच्या मुख्यमंत्री कक्षामध्ये भेटीच्या निरोपाची प्रतीक्षा करत 12 तास बसून होते. या 12 तासांच्या काळात भाजपच्या नेत्यांनी शिंदे यांना भेटीची वेळही दिली नाही आणि त्यांच्याशी कोणतीही चर्चाही केली नव्हती. या सगळ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शिवसेनेनं आपल्या आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीचाही दाखला दिला आहे. स्वतःस शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणवून घेणारे शिंदे वारंवार दिल्ली दरबारी का जात आहेत, हा प्रश्नच आहे. शिंदे हे म्हणे मंत्रिमंडळाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. हे आक्रित आहे. यापूर्वी शिवसेनेचे तीन मुख्यमंत्री झाले. त्यातील दोन भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत होते; पण एकही मुख्यमंत्री मंत्रिमंडळ काय व कसे करायचे याबाबत चर्चा करण्यासाठी कधी दिल्लीत गेला नाही. पण आताची परिस्थिती वेगळी आहे. दिल्लीसमोर झुकल्याने, मोडून पडल्यानेच फुटीर गटाला मुख्यमंत्रीपद मिळाले हे आता उघड झालं आहे, अशा शब्दांत सामनातून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.