मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षही आपल्या ताब्यात कसा येईल याकडे लक्ष केंद्रीत केलं. आपला गट कायम राखण्यासाठी त्यांनी सर्वात आधी हालचाली केल्या. भरत गोगावले यांच्याकडे विधीमंडळाचं मुख्यप्रतोदपद दिलं. स्वत: गटनेते झाले. आता शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. या खासदारांनी शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली. शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केली. तसेच मुख्यप्रतोदपदी भावना गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, शिंदे यांच्या गटाचे प्रतोद आणि गटनेत्यामागे काही ना काही शुक्लकाष्ठ लागलेलं आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेला फसवल्याचा गुन्हा आहे. तर भावना गवळी यांच्या मागे ईडीचा ससेमिरा आहे.
महिलेची फसवणूक केल्याचा आरोप
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेने शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच साकीनाका पोलिसात या महिलेने तक्रार दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणातून शेवाळे यांना दिलासा मिळाला आहे. या महिलेविरोधातच साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीवसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने आरोप केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.