आजपासून पावसाळी अधिवेशन; 12 ऑगस्टपर्यंत चालणार
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला
प्रारंभ वृत्तसेवा
दिल्ली : संसदेचं पावसाळी अधिवेशन आज (ता. 18) पासून सुरू होत असून ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हा काळ खूप महत्वाचा आहे. येणाऱ्या 25 वर्षांनी देश शताब्दी साजरी करेल. या काळात आपल्याला नव्या उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला संकल्प करायचे आहेत. आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचं सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र मानतो, जिथं खुल्या मनानं संवाद होतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सभागृहाचे सर्व सदस्य देशात नवी उर्जा भरण्यासाठी मदत करतील. हे अधिवेशन यासाठी महत्वाचं आहे. या अधिवेशनात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही नेहमी सभागृहाला संवादाचं सक्षम माध्यम मानतो, तीर्थक्षेत्र मानतो, जिथं खुल्या मनानं संवाद होतात. गरज पडल्यास वादविवाद व्हायला पाहिजे. विश्लेषण झालं पाहिजे. कारण धोरणं आणि निर्णयात सकारात्मकता येते. माझं सर्व सदस्यांना आवाहन आहे की गहन चर्चा व्हाव्यात. उत्तम चर्चा आवश्यक आहेत. यासाठी सर्वांचं सहकार्य हवं. सर्वांच्या प्रयत्नानं सभागृह चालतं. त्यानं चांगले निर्णय सदनात होता. त्यामुळं सदनाची गरिमा वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. राष्ट्रहितासाठी आपण सभागृहाचा वापर करावा, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
अधिवेशनात 24 विधेयक मांडली जाणार
या पावसाळी अधिवेशनात एकूण 18 बैठका होणार असून 24 विधेयकं मांडली जाणार आहेत. पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारनं रविवारी 17 जुलै रोजी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी सुमारे 25 मुद्द्यांवर सरकारशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. सर्वपक्षीय बैठकीला पंतप्रधान मोदी गैरहजर होते या मुद्द्यावरुन काँग्रेसनं भाजपला घेरत, खिल्ली उडवली आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीकास्त्र डागलं होतं.