कोरोनाशी युद्ध सुरू असतानाच आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांपर्यंत गेला असताना आता मात्र नव्या संकटाला सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे म्युकरमायकोसीस (काळी बुरशी) आजाराला. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अथवा मधुमेह नियंत्रणात नाही अशा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या आजाराची लागण होताना दिसून येत आहे. मात्र प्रत्येक कोरोनाबाधिताला हा आजार होतोच असे नाही, त्यामुळे घाबरून न जाता त्याविषयी शास्त्रीय माहिती घेऊनच प्रतिबंध करावा. राज्य शासनाने त्यावर तातडीच्या उपाययोजना सुरू देखील केल्या आहेत.
राज्य शासनाच्या उपाययोजना
राज्य शासन यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने या आजाराविषयी आढावा घेत आहेत. ‘म्युकरमायकोसीस’चा अंतर्भाव महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ३० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात काळी बुरशी (म्युकरमायकोसीस) आजाराचे सुमारे १५०० हून अधिक रुग्ण असून त्यात वाढ होताना दिसत आहे. कोरोना पश्चात रुग्णांमध्ये मधुमेह नियंत्रित नसणे, प्रतिकार शक्ती क्षीण होणे आदी कारणांमुळे या आजाराचे रुग्ण वाढताहेत. या आजारावरील उपचारासाठीच्या इंजेक्शनची किंमत जास्त असून त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी या औषधावरील छापील एमआरपी कमी करावी. या औषधाचा महाराष्ट्रासाठी कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. काळी बुरशी आजाराविषयी नागरिकांमध्ये जाणीवजागृती होणे आवश्यक असून त्यासाठी राज्य शासन मोहीम हाती घेईल, केंद्र शासनाने देखील त्यामध्ये सहभागी होऊन जनजागृतीसाठी मोहीम घेण्याचे आवाहन केले आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचाराची स्वतंत्र पथक देखील नेमावे, अशा सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
नेमका काय आहे ‘म्युकरमायकोसीस’
म्युकरमायसेटीस नावाच्या बुरशीमुळे हा संसर्ग होतो. ती पर्यावरणात नैसर्गिकरित्या अस्तित्वात असते मात्र जेव्हा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते अशावेळेस म्युकरमायकोसीसची लागण होते. या बुरशीचा कण श्वासाद्वारे शरीरात गेल्यावर फुफ्फुस आणि सायनसेस वर दुष्परिणाम होतो. योग्यवेळी निदान व बुरशीप्रतिकारक उपचार केल्यास रुग्ण बरा होतो. प्रतिकारशक्ती कमी असलेली व्यक्ती, इतर दिर्घकालीन आजार मुख्यतः मधुमेह औषधोपचार ( स्टीरोइड्सचा गरजेपेक्षा जास्त वापर) कर्करोग पीडित रुग्ण यांना ह्या आजाराची लागण होताना दिसून येते.
लक्षणे
डोके दुखणे, चेहऱ्याला सूज येणे, ताप येणे, तोंडामध्ये गळू येणे व त्यामधून पू येणे, दातातून पू येणे, दात हलणे जबड्याचे हाड उघडे पडणे, हिरड्यांना सूज येणे व त्यातून रक्त येणे, सायनसेसमध्ये रक्तसंचय आढळणे, डोळ्यांना सूज येणे व हालचाल कमी होणे, चेहऱ्याची त्वचा काळी पडणे, नाकात काळे सुके मल तयार होणे, दात काढल्यानंतर न भरणारी जखम इत्यादी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आढळल्यास दंत अथवा मुख आरोग्य तज्ञांकडून त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे.
काय करावे
-
रक्तातील साखर नियंत्रीत ठेवावी
-
मधुमेही रुग्णांनी आणि कोरोनातून बरे झालेल्यांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे
-
स्टेरॉईडचा वापर सांभाळून करावा
-
ऑक्सिजन उपचाराच्यावेळेस ह्युमीडीफायरमध्ये स्टराईल वॉटर वापरावे
निदान आणि तपासणी
रुग्णाची योग्य माहिती घेणे आवश्यक आहे. कोविड व स्टीरॉईडचा तपशील माहिती घेणे आवश्यक. रक्त तपासणी करणे. सी. टी स्कॅन, इंडोस्कोपी व बायोप्सीच्या साह्याने म्युकरमायकोसीसचे निदान करणे सोपे आहे
उपचार
‘एम्पोटेरेसिन बी’ या इंजेक्शचा वापर केला जातो व आवश्यकता वाटल्यास शस्त्रक्रिया केली जाते.
प्रत्येक कोरोनोबाधित व्यक्तिला हा आजार होतो असे नाही. कोरोना रुग्णांनी आपल्या मौखिक आरोग्याची निगा राखणे व काळजी घेणे हे गरजेचे आहे. कोरोनानंतर म्युकरमायकोसीसचा धोका असलेल्यानी १० ते २० दिवसांच्या आत तपासणी करून घेणे गरजेचे आहे व त्यामुळे संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.