धनंजय मुंडे यांनी परळीत मुस्लिम बांधवांसोबत केली रमजान ईद साजरी
परळी : सर्व धर्म समभाव, सद्भावना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणाऱ्या रमजान ईद एकत्रित साजरी करून आम्ही आपसातील स्नेह व बंधुभाव जोपासण्याचा संदेश एकमेकांना देतो, असे मत रमजान ईद निमित्त सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे व्यक्त केले आहे.
परळी येथील नेहरू चौक ईदगाह मैदान व बडी ईदगाह मैदान मलकापूर रोड या ठिकाणी मुस्लिम बांधवासमवेत रमजान ईद साजरी केली. धनंजय मुंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ईद च्या उत्सवात सामील झाले. त्यांनी लहान थोरांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.
परळी येथे मागील अनेक वर्षांपासून धनंजय मुंडे हे सर्व जाती-धर्मांच्या सण-उत्सवात सहभागी होतात. मागील दोन वर्षे कोविड निर्बंधांमुळे रमजान ईद सार्वजनिक रित्या साजरी करण्यात आली नव्हती, यावर्षी मात्र ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदची नमाज अदा केली.
धनंजय मुंडे यांनी मुस्लिम समाजातील लहान थोरांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, चंदूलाल बियाणी, दीपक नाना देशमुख, जयप्रकाश लड्डा, वैजनाथ सोळंके, सय्यद सिराज, राजा खान पठाण, अनंत इंगळे, रवी मुळे, बळीराम नागरगोजे यांसह आदी उपस्थित होते.