अपघात प्रकरणाची आयपीएस पंकज कुमावत यांच्यामार्फत चौकशी करा
तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त का घेतला नव्हता?
वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी जाताना तहसीलदार यांनी खासगी गाडी का वापरली?
कारवाईला जाण्यापूर्वी तहसीलदार यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली का? या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करा
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : तालुक्यातील म्हाळसजवळा येथील मंडळ आधिकारी स्व.नितिन जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचे कारणही तसेच आहे. एखादा तहसीलदार दर्जाचा अधिकारी मध्यरात्री वाळूतस्कर प्रकरणात कारवाई करण्यासाठी जात असेल तर तो अधिकारी फक्त मंडळअधिकारी यांनाच सोबत घेवून का जातो? जाताना खासगी गाडीच का वापरतो? कारवाईला जाताना याची कल्पना वरिष्ठांना देतो का? कारवाईला जात असताना पोलीस अधिकाऱ्यांना सोबत का घेवून गेले नाहीत? यासह इतर प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत. प्रभारी तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी नियमांचे उल्लंघन का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात नितीन जाधव यांचा यात मृत्यू झाला असून या मृत्यूची सुद्धा सखोल चौकशी करा व ती चौकशी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्यामार्फत करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री व गृहविभागाकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 6 मार्च 2022 रोजी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास बीडचे प्रभारी तहसिलदार सुरेंद्र डोके व म्हाळसजवळा ता.जि.बीड येथील मंडळ आधिकारी नितिन जाधव यांच्या गाडीचा सावळेश्वर फाटा याठीकाणी अपघात झाला होता. यात मंडळ आधिकारी नितिन जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. व तहसिलदार सुरेंद्र डोके जखमी झाले होते, दोघेही राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिंपळा येथे अवैध वाळु वाहतुक विरोधात कारवाईसाठी गेले होते. या दरम्यान ही घटना घडली होती. परंतु या घटनेला जाण्यापूर्वी तहसीलदार यांनी नियमानुसार आवश्यक ती खबरदारी का घेतली नाही याची सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे. तहसीलदार सुरेंद्र डोके यांची सविस्तर चौकशी करून यात जे दोषी आढळतील त्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पाडळसिंगी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासाच
तहसिलदार सुरेंद्र डोके यांच्या मोबाईलचे सीडीआर व टोलनाक्यावरील वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे तहसिलदार सुरेंद्र डोके यांचे त्या दिवशीचे सीडीआर तपासण्यात यावेत तसेच पाडळशिंगी टोलनाक्यावरील आवक जावक वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येऊन व संबधित प्रकरणात चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक कार्रवाई करण्यात यावी.