बीड :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि.26 जानेवारी 2022 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ होणार आहे.
याच बरोबर जिल्हयात विविध ठिकाणी ध्वजारोहण केले जाणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी सकाळी 8.15 वाजता होणार आहे. तसेच मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम अपर जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते सकाळी 7.45 वाजता संपन्न होणार असून दोन्हीही ध्वजारोहण समारंभ संपल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा पोलीस मुख्यालय मैदान बीड येथील ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभास सकाळी 8.30 पूर्वी शासकीय गणवेषात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.
कोविड-19 साथरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क लावणे, सॉनिटाईझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे.
तसेच शासन निर्णयानुसार ध्वजारोहण कार्यक्रमापुर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिका (सरनामा) याचे सामुहिक वाचन करण्यात येणार आहे. भारतीय संविधानातील मुलतत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारित करणारी असून उद्देशिका सामूहिक वाचनाच्या माध्यमातून नागरिकांच्या मनात याची रुजवणूक झाल्यास जबाबदार, सुजाण व सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होईल.