काल्पनिक भीती सोडून विकासाभिमुख भाजप पक्षाला साथ देण्याचे आवाहन
बीड ( प्रतिनिधी ) काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात भावनिक राजकारण करा मुस्लिम समाजाचा केवळ वोट बँक म्हणून वापर केला. काल्पनिक भीती दाखवून या समाजाला विकासापासून कोसो दूर ठेवले. मात्र भारतीय जनता पार्टीने मुस्लिम समाजाला प्रत्येक वेळी प्रतिनिधित्व करण्याची संधी देत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पाच नगरपंचायत निवडणुकीत भाजपकडून 11 नगरसेवकांना जनतेने प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे काल्पनिक भिती सोडून मुस्लिम समाजाने विकासाभिमुख पक्षाला साथ द्यावी असे आवाहन भाजप नेते तथा नगर पंचायत निवडणूक प्रभारी सलीम जहाँगीर यांनी केले आहे.
भाजप नेते सलीम जहाँगीर यांनी म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा , शिरूर, केज , वडवणी नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आ. सुरेश धस, राजाभाऊ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीमध्ये भाजपने तब्बल 11 मुस्लिम नगरसेवकांना लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. भाजपने मुस्लिम उमेदवारांवर टाकलेला विश्वास जनतेने सार्थ ठरवत त्यांना विजयी केले. भाजप हा अठरापगड जाती धर्माचा पक्ष असून विकास कामात कधीच भेदभाव करत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. सच्चर आयोगाच्या अहवालाने मुस्लीम समाजाची आर्थिक आणि शैक्षणिक प्रगती दाखवून दिली आहे. गेल्या सात वर्षात केंद्रातील भाजप सरकारने कोणत्याही योजनेत भेदभाव केला नाही. घरकुल, उज्वला योजना यामध्ये प्रत्येक समाजाला न्याय मिळवून दिला. दहा टक्के आरक्षणामध्येही सर्वांगिन विकास साधला गेला. त्यामुळे आता तरी मुस्लिम समाजाने कोणाची व्होट बँक होण्याऐवजी विकास करणाऱ्या भाजप पक्षासोबत उभे राहावे असे आवाहन भाजप नेते तथा नगरपंचायत निवडणूक प्रभारी सलीम जहाँगीर यांनी केले आहे.