प्रारंभ वृत्तसेवा
राज्य शासनाकडून एकूण 1413 कोटी रुपये मंजूर
बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध – धनंजय मुंडे
मुंबई : —- अहमदनगर बीड परळी या बहु प्रतीक्षित रेल्वे मार्गाकरिता 2826 कोटी एवढा
खर्च अंदाजित असून उक्त खर्चा पैकी एकूण 1413 कोटी असा 50% टक्के हिस्सा राज्य शासनाकडून रेल्वे बोर्डास उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या शासन निर्णय क्रमांक 1021/133 अंतर्गत आणखी 90.13 कोटी रुपये बीड रेल्वे साठी मंजूर करण्यात आले आहेत.
बीड जिल्हा वासीयांचे रेल्वेचे पूर्ण स्वप्न करण्याची 50% जबाबदारी ही राज्य सरकारची असून यासाठी वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला जाईल, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज मंजूर झालेल्या 90 कोटींसह भविष्यातही ठरलेल्या समिकरणाप्रमाणे वेळोवेळी निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
बीडचे तीन पिढ्याचे स्वप्न म्हणून रेल्वे प्रश्न रखडलेला आहे. सदरील रेल्वे प्रकल्पा करिता केंद्र शासनाने दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत 1557 कोटी इतका खर्च केला असून 2021-22 साठी 249 कोटी इतकी तरतूद केली असल्याचे मध्य रेल्वेने कळवले आहे.
राज्य शासनाने 31 मार्च 2021 पर्यंत एकूण 1322.87 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिलेला आहे. प्रकल्पाच्या खर्चात हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन सन 2021-22 करिता रेल्वेने केलेल्या मागणीच्या रक्कमे पैकी 90.13 कोटी निधी राज्य सरकारने मंजूर करून वितरित करण्यास परवानगी दिली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अर्थ व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राज्य शासनाचे आभार मानले आहेत.