जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीचे आदेश; 502.37 कोटी तहसीलदारांना वितरित
बीड प्रतिनिधी ‘: राज्य शासनाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने 2860 कोटी रुपयांची प्राथमिक मदत काल अध्यादेश जारी करून महसुली यंत्रणेमार्फत वितरित करण्याचे घोषित केले होते. त्यानंतर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी ही मदत शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी यानुषंगाने यंत्रणांना तातडीने कामाला लावले; बीड जिल्हा प्रशासनाने 24 तासांच्या आत यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण केली असून, आज तहसीलदारांमार्फत तालुका स्तरावर ही मदत वितरित करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
राज्य शासनाने मदत जाहीर केल्यानंतर बीड जिल्ह्याच्या वाट्याला मराठवाड्यात सर्वाधिक 502.37 कोटी रुपये मदत मिळणार आहे. ही रक्कम अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व संबंधित तहसीलदारांना उपलब्ध करून देत वितरण करण्यासंबंधीचे आदेश आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्गमित केले आहेत.
संबंधित तहसीलदारांनी या रक्कमा महसुल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने थेट जमा कराव्यात असेही या आदेशद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात या रक्कमा दिवाळीपूर्वी जमा होतील हे आता निश्चित झाले आहे.
दरम्यान पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी सदर वितरणासाठी जिल्ह्यास आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, त्याचे विना व्यत्यय तातडीने वितरण व्हावे तसेच शेतकऱ्यांना वितरण करताना कोणतीही कपात किंवा वसुली या रक्कमेतून करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे ‘आपल्याला राजकारण नाही तर शेतीकारण करायचे आहे’, असे धनंजय मुंडे यांनी काल केलेले वक्तव्य तंतोतंत लागू पडत असल्याचा जणू प्रत्ययच येतो!