कोव्हीड नियमांचे पालन करुन दर्शन घेता येणार!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : नवरात्र उत्सव म्हटले की, उत्सवाचे वातावरण, आनंदाचे वातावरण परंतु गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे हा उत्सव झालेला नाही. यंदा सुद्धा कोरोनाच्या परस्थितीमुळे अनेक नियम लागू असल्यामुळे सलग तिसऱ्या वर्षी सुद्धा खंडेश्वरी यात्रा होणार नाही. परंतु सध्या कोरोनाची परस्थिती काही प्रमाणात कमी झाल्यामुळे भाविकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. या अनुषंगाने मंदिर प्रशासनाने नियोजनाची तयारी सुरु केली आहे.
बीड शहराचे ग्रामदैवत खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी खंडेश्वरी परिसरात असते. याठिकाणी भाविक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे प्रशासनासह मंदिर प्रशासनाच्या वतिने सुद्धा याठिकाणी चोक नियोजन केलेले असते. लहान-मोठे पाळणे, विविध दुकाने, हॉटेल यासह इतर दुकाने नवरात्र यात्रेच्या दरम्यान याठिकाणी उभारलेली असतात. परंतु गेल्या दोन वर्षा प्रमाणे याही वर्षी येथील खंडेश्वरी देवीची यात्रा होणार नाही. परंतु यंदा भाविकांना कोरोनाचे नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. याठिकाणी पेढ्याचे व पानफुलांचे दुकाने असणार आहेत. यासह प्रत्येक तीन तासाला मंदिर परिसरात सॅनिटायझरने फवारणी करण्यात येणार आहे. यासह इतर कोरोना नियम पाळून भाविकांना दर्शन घेता येणार असल्याची माहिती खंडेश्वरी मंदिराचे अध्यक्ष रणजीतसिंह चौहाण यांनी प्रारंभशी बोलताना दिली.