प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई : ‘ऑगस्टमध्येच येणार करोनाची तिसरी लाट, ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक’; महाराष्ट्रासाठीही धोक्याची घंटा हैदराबाद आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच आयआयटीमध्ये करण्यात आलं संशोधन.
देशामध्ये करोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात याच महिन्यामध्ये होऊ शकते असा दावा एका अहवालामध्ये करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यातच देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा फैलाव काही प्रमाणात सुरु होईल असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या लाटेमध्ये दिवसाला एक लाखांहून अधिक नवे करोना रुग्ण आढळून येतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती चिंताजनक झाल्यास दिवसाला रुग्णसंख्येचा आकडा दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. हैदराबाद आणि कानपूरमधील भारतीय प्रौद्योगिक संस्था म्हणजेच आयआयटीमध्ये मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनिंद्र अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या संशोधनानंतरच्या अहवालात हे दावे करण्यात आले आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्येच तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यताही व्यक्त करण्यात आलीय. ब्लुमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी एका ईमेलच्या माध्यमातून ही माहिती दिलीय. केरळ आणि महाराष्ट्रामधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक होऊ शकते असंही विद्यासागर म्हणाले असून ही या राज्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचं सांगण्यात येत आहे. करोनाची तिसरी लाट ही दुसऱ्या लाटेइतकी घातक नसेल असंही सांगितलं जात आहे.
याच वर्षी मे महिन्यात आयआयटी हैदराबादमधील प्राध्यापक विद्यासागर यांनी भारतामधील करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता मॅथमॅटिकल मॉडलच्या आधारावर मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक पहायला मिळेल असं म्हटलं होतं. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार विद्यासागर यांनी मे महिन्यामध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाईल आणि आकडेवारी पाहता जूनच्या शेवटापर्यंत दिवसाला 20 हजार करोना रुग्ण आढळून येतील असंही विद्यासागर त्यावेळेस म्हणाले होते. मात्र विद्यासागर यांच्या टीमचा अंदाज चुकला होता. यासंदर्भात बोलताना त्यांनी चुकीच्या मापन पद्धतीमुळे अंदाज चुकल्याचं सांगितलं होतं. करोना प्रादुर्भावाच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. त्यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार करोना रुग्णसंख्येचा उच्चांक 3 ते 5 मे दरम्यान असेल असं सांगितलं होतं. तर इंडिया टुडेला त्यांनी 7 मेच्या आसपास करोना रुग्णसंख्येचा उच्चांक काढला जाईल असं म्हटलेलं.
भारतामध्ये रविवारी करोनाचे 41 हजार 831 रुग्ण आढळून आले आहेत. देशात रविवारी करोनामुळे 541 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातील राज्यांसहीत 10 राज्यांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या राज्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आदेश केंद्राने दिलेत.
तज्ज्ञांनाही करोनाचा डेल्टा व्हेरिएंट हा कांजण्या आणि इतर संसर्गजन्य आजारांसारखा पसरु शकतो असा अंदाज व्यक्त केलाय. लसीकरण झालेल्यांच्या माध्यमातूनही संसर्ग होऊन रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. इंडियन सार्क कोव्ही-2 जेनोमिक कॉनर्सोर्टीयमने दिलेल्या माहितीनुसार मे, जून आणि जुलै महिन्यातील दर 10 करोना रुग्णांपैकी 8 जणांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालेला.