प्रारंभ वृत्तसेवा
बीड : पंधरा महिन्यांपूर्वी समाज माध्यमातून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि बदनामीजनक टिपणी केल्याप्रकरणी सिरसाळा (ता.परळी) येथील तरुणाला अटक करण्यात आलेी. अहमदाबाद पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्या तरुणाने स्वत: आत्मसमर्पण केल्याने पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले.
बीड जिल्ह्यातील सिरसाळा (ता. परळी) येथील फैसल खान युसुफजई (वय 20) याचे परळीत मोबाइलचे दुकान आहे. पंधरा महिन्यापूर्वी त्याने गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल समाज माध्यमातून बदनामीकारक टिपणी प्रसारित केली होती. ही टिपणी कोविडच्या अनुषंगाने केली होती. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अहमदाबाद शहर सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के.के. मोदी यांनी फैसल खान याच्याविरुध्द 18 एप्रिल 2020 रोजी जनतेत भीती निर्माण करण्याच्या हेतूने किंवा एखाद्या वर्गाला दुखावण्याच्या हेतूने प्रेरित करणारा मजकूर असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य किंवा सार्वजनिक शांततेविरुध्द गुन्ह्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या संबंधित कलमान्वये त्याच्याविरुध्द कारवाई करण्यात आली होती. तब्बल पंधरा महिन्यानंतर अहमदाबाद सायबर गुन्ह्यांच्या पथकाने बीड जिल्ह्यात येऊन फैसल खान यास नोटीस बजावली.