-कोव्हीडचा आढावा घेण्यासाठी आज ना. धनंजय मुंडे जिल्ह्यात
-हातावर पोट असणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय होईना
– व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत आहे
-नियमात सतत होणाऱ्या बदलामुळे सर्व सामान्यवर्ग विविध समस्यात सापडत आहे
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात परत कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे जिल्ह्याची चिंता सुद्धा वाढताना दिसत आहे. याच अनुषंगाने कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आज (ता. 30) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात येत आहेत. परंतु पालकमंत्री साहेब जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन सर्वच प्रश्न मार्गी लागणार नाहीत. सर्व सामान्यांच्या समस्यापण समजुन घ्याव्या लागतील. गेल्या दोन वर्षापासून सुरु असलेल्या कोव्हीडच्या परस्थितीमुळे जिल्ह्यातील सर्व सामान्यवर्ग विविध समस्यांनी त्रस्त झाला आहे. यामुळे आपण ज्या प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हीडचा आढावा घेत आहात त्याच प्रकारे जिल्ह्यातील सर्व सामान्यांशी संवाद साधून सर्व सामान्यांना येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातल्या नंतर संपुर्ण जगाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात बीड जिल्ह्याला सुद्धा गेल्या दोन वर्षापासून विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. बीड जिल्हा मुळात आर्थिक बाबीत कमजोर असलेला जिल्हा आहे. याठिकाणी हातावर पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व सामान्यांना लॉकडाऊनचा सर्वात जास्त फटका बसलेला आहे. पालकमंत्री आज बीडच्या दौऱ्यावर येत आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी कोव्हीडचा आढावा सुद्धा घेणार आहेत. परंतु पालकमंत्री साहेब जिल्ह्यात सध्या विविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. हातापवर पोट असणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची सोय होत नाही, व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे, सतत नियमात होणाऱ्या बदलामुळे सर्व सामान्यांवर्ग विविध समस्यात सापडत आहे. यासह इतर समस्या सध्या जिल्ह्यात निर्माण होत आहेत. यामुळे आपण जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधुन जिल्ह्यात निर्माण झालेले प्रश्न मार्गी लावावेत व जिल्ह्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी बीडकर करत आहेत.