आ सुरेश धस यांचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा
प्रारंभ वृत्तसेवा
बीड प्रतिनिधी :- कोविड 19 महामारीमधील जीवघेण्या परिस्थितीत सेवा दिलेले कोविड कंत्राटी कर्मचारी, भोजन व्यवस्था व इतरांची देयके जिल्हा प्रशासनाने रखडवली आहेत. कोविड पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा झाला मात्र या दौऱ्यातून कसलाही फायदा या जिल्ह्याला झाला नाही. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) मध्ये निधी नाही, जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळात निधी नाही, तिजोरीत खडखडाट असणारा बीड हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा बनला असल्याचा आरोप करत भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी 8 दिवसांत कोविड कंत्राटी कर्मचारी, भोजन व्यवस्था व इतर देयके देण्यात यावीत अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात बोंब मारो आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्याकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष केले जाते आहे. या जिल्ह्यात कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याइतके पैसे नसावेत ही दुर्दैवी बाब आहे. भाऊ-बहीण, आई – वडील, नाते-गोते जेव्हा दुर्लक्ष करत होते तेव्हा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावत माणसांना कोविड मधून बाहेर काढण्याचे काम केले. मात्र या कोविड योद्ध्यांना त्यांचे वेतन देखील सरकार देत नसेल तर ही लाजिरवाणी बाब आहे. शासकीय कोविड सेंटरवर भोजन व्यवस्था करणाऱ्यांचे जिल्हाभरातील देयके अद्याप बाकी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जूनच्या मध्यावधीमध्ये कोविड आढावा बैठक घेतली मात्र या बैठकीतून जिल्ह्याच्या पदरी आद्यपदेखील अपेक्षित असे काहीही हाती आलेले नाही. जिल्ह्याला पीकविमा नाही ना पिककर्जाचे अपेक्षित वाटप. सर्वसाधारण जनता, शेतकरी जिल्ह्यात त्रस्त आहेत. 8 दिवसात कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे, भोजप व्यवस्था करणाऱ्यांचे बाकी असलेले पैसे दिले गेले नाही तर जिल्हाधिकारी यांच्या दारात बोंब मारो आंदोलन केले जाईल असा इशारा आ सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी यांना दिला आहे.