बलात्काराची फिर्याद न घेता त्या प्रकाराची माहिती त्या नराधमाला दिली; पिडीत नर्सचा आरोप
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक पिडीत नर्स न्याय मागण्यासाठी गेल्या सोमवारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेली होती, परंतु येथील पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी तिची तक्रार घेतली नाही व या प्रकारची माहिती संबंधित नराधमाला दिली अशा आरोप पिडीत नर्सने केला आहे. यानंतर संबंधित युवकांने त्या पिडीत नर्सला दारु पाजूण मारण्याच्या बेताने दुचाकीवर धुळे सोलापुर या मार्गावर नेली, येथील टोलनाका परिसरात दुचाकीवरुन उडी मारली, याच दरम्यान दुचाकी दुसऱ्या वाहनांवर धडकली यात पिडीत नर्स जखमी झाली असून गेल्या तीन दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केली आहे.
कोव्हीडच्या काळात ज्या नर्सने रुग्णांची सेवा केली त्याच नर्सवर आज वाईट वेळ आलेली आहे. बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील एक नर्स तिच्यावर झालेल्या बलात्काराची तक्रार घेऊन शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेली. परंतु यावेळी तिची तक्रार येथील पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबर यांनी घेतली नाही व येथील पोलीस कर्मचारी मेकले यांनी याची माहिती संबंधित नराधमाला दिली. यानंतर त्या पिडीत नर्सवर त्या नराधमाने तिच्या घरी जाऊन तिला दारु पाजली, मारहाण केली व तिला मारण्याच्या हेतुन तिला धुळे सोलापुर या मार्गावर नेले व पाडळसिंगी टोल नाका परिसरात दुचाकीवरुन उडी मारली. यानंतर ति दुचाकी दुसऱ्या गाडीला धडकली यात पिडीत नर्स ही जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकारात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांनी केली आहे. यासह ते आज जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना या बाबात निवेदन देणार आहेत.
दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा; शिवराज बांगर
दलित समाजातील नर्स मुलीवर अत्याचार झाल्यानंतर संबंधित पिडीत नर्स ही शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गेली होती. परंतु तिची तक्रार याठिकाणी घेण्यात आली नाही. पिडीतेवर अत्याचार करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचारी यात लक्ष देत नाही. आज आम्ही संबंधित पिडीत मुलीची जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे. या प्रकारणी संबंधित अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करा व त्यांना सहआरोपी करा अशी मागणी आम्ही जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याकडे करणार आहोत. (शिवराज बांगर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)
पोलीस निरीक्षक यांची प्रतिक्रिया
गेल्या सोमवारी संबंधित मुलगी आमच्या कडे आली होती परंतु ती बलात्काराची तक्रार घेऊन आली नव्हती तर तिला संबंधित मुलाने फोनवर मारण्याची धमकी दिल्याची तक्रार घेऊन आली होती. यानंतर आम्ही तिची तक्रार घेतली व पोलीस कर्मचारी नेकले यांना संबंधित मुलाला पोलीस ठाण्यात बोलावण्याच्या सुचना केल्या होत्या. यासह आम्ही माहिती घेतली असता तो मुलगा व ति मुलगी गेल्या अनेक दिवसापासून लव्ह रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती आम्हाला प्राप्त झाली. अशी माहिती प्रारंभ ला पोलीस निरीक्षक साईनाथ ठोंबरे यांनी दिली.