प्रारंभ न्युज
बीड : महाविकास आघाडी सरकार सत्तेत मश्गुल आहे. त्यांना सामान्य माणसाच्या प्रश्नांचे देणेघेणे नाही. मराठा समाज आरक्षण रद्द झाल्याने अस्वस्थ आहे, तर संकटाच्या काळात जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्यांना सन्मानाएवजी मार मिळत आहे. अशावेळी सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून लोकनेते सुरेश आण्णा धस यांनी आंदोलन छेडले आहे. आपले हक्क अन न्याय पदरात पाडून घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य ऍड. प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.
विधान परिषदेचे सदस्य लोकनेते आ. सुरेश आण्णा धस यांनी सोमवारी (दि.28) विविध मागण्यांसाठी मोर्च्यांची हाक दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कोरोना सारख्या महामारीत जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा करणाऱ्या कंत्राटी परिचारिका आणि आरोग्य सेवकांना कायमस्वरूपी सेवेत घ्या, शेतकऱ्यांना तात्काळ खरीप हंगामातील विमा द्या, भूसंपादन होवूनही वर्षानुवर्षे मावेजाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ मावेजा द्या यासारख्या लोकहिताच्या मागण्यांसाठी आ. धस आण्णा रस्त्यावर उतरत आहेत. तेव्हा जिल्ह्यातील सामान्य माणसांनी पक्ष, राजकारण बाजूला ठेऊन आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या अण्णांना साथ दिली पाहिजे. राज्य सरकार लोकांची दिशाभूल करून सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत आहे. अशावेळी या सरकारला वठणीवर आणण्यासाठी सामान्य माणसाला रस्त्यावर यावं लागणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन जनतेची ताकद दाखवून देण्यासाठी अण्णांच्या नेतृत्वाखाली तरुणांनी, शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जि.प.सदस्य ऍड. प्रकाश कवठेकर यांनी केले आहे.