जिल्हाधिकारी साहेब नियमांची कडक अमलबजावणी कराच!
प्रारंभ वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आता अपुरी पडू लागली आहे. यासह इतर प्रश्न सुद्धा गंभीर बनत असताना सुद्धा बीडकर बिनधास्त फिरत असल्याचे चित्र आज शहरात पहाव्यास मिळाले. जिल्हा प्रशासनाने आता कोणताही हलगर्जी पणा न करता जे नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांची कडक अमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू सुद्धा जास्त होत आहेत. आरोग्य यंत्रणा हातबल होताना दिसत आहे. बेड मिळत नाहीत, रेमडेसिवीरचा काळाबाजार, ऑक्सिजन अपुरा, लसींच तुटवडा यासह इतर समस्या सध्या जिल्ह्यात निर्माण झालेल्या आहेत. एवढी गभीर बाब असताना सुद्धा जिल्हा प्रशासन झोपण्याचे सोंग घेत आहे. तर दुसरीकडे बीडकर हे बिनधास्त असल्याचे आज शहरात झालेल्या गर्दी वरुन दिसून आले. आता बीडकरांनी खबरदारी घेत या आलेल्या संकटातुन निघण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात ठिक-ठिकाणी गर्दी
जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी विविध कडक नियम लावलेले आहेत. परंतु या सर्व नियमांची कडक अमलबजावणी होत नसल्यामुळे आज शहरात ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली. जिल्हाधिकारी साहेब जिल्ह्यात आता कडक नियमांची अमलबजावणी करण्याची गरज आहे. नसता जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाईल
नागरीकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे
प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करुन नागरीकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याची वेळ आलेली आहे. सध्या जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढ आहे. यामुळे आता हा कहर रोखण्यासाठी नागरीकांनी सुद्धा नियमांचे पालन करावे.