नातेवाईकांनी रुग्णालयात घातला गोंधळ
प्रारंभ वृत्तसेवा
मुंबई : करोना रुग्णसंख्येच्या स्फोटक वाढीचा भार आरोग्य व्यवस्थेला असह्य होत असल्याचं चित्र आहे. राज्यात अनेक ठिकाणी रुग्णांची हेळसांड होत असून, अनेक ठिकाणी रुग्णांना बेड, ऑक्सिजन, आयसीयू बेडच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. यातच आता ऑक्सिजन न मिळाल्याने सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला.
वसई विरारमध्ये दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून, सोमवारी ऑक्सिजनअभावी ११ रुग्णांना प्राण गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यात नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्ण ऑक्सिजन न मिळल्याने मरण पावले आहेत. ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास रुग्णालयील ऑक्सिजनचा साठा संपला होता. त्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन देता आला नाही आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. हे सर्व रुग्ण अत्यवस्थ होते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे.