विकेंड लॉकडाऊनमध्ये संपूर्ण दुकाना बंद; नागरिक घरात
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात 30 एप्रिलपर्यंत विविध कडक निर्बंध लागू केले आहेत. यात विकेंड लॉकडाऊन शनिवार, रविवारी हे दोन दिवस कडक बंद राहणार असून याचा आज पहिला दिवस होता. या विकेंड लॉकडाऊनला जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकांनी आपापले व्यवसाय बंद करून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्याचे आज दिसून आले. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आता नागरिकांनीच ही लढाई हातात घेतले असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. असाच प्रतिसाद जिल्हा प्रशासनाला नागरिकांकडून मिळाला तर नक्कीच आपण या कोरोनावर मात करू.
देशभरात कोरोनाची दुसरी लाट सक्रीय होत असून याचे संक्रमण राज्यात दिसून येत आहेत. यात बीड जिल्ह्यात सुद्धा गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी पडण्याची भीती आता जास्त निर्माण झाली आहे. आजपासून जिल्ह्यात दोन दिवसांचा विकेंड लॉकडाऊन सुरू झाला असून पहिल्या दिवशी नागरिकांनी या विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. बीड शहरातील सुभाष रोड, मोंढा, बार्शी रोड, जालना रोड, नगर रोड यासह जिल्ह्यातील प्रमुख महामार्गावरील रस्ते शुकशुकाट होते. यासह व्यापारी सुद्धा आपला व्यवसाय बंद करून घरातच होते. नागरिकांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे व पुढे सुद्धा असाच प्रतिसाद जिल्हा प्रशासनाला मिळाला तर नक्कीच आपण या कोरोनाला हरवू व पहिल्यासारखे आपण परत आपले दैनंदिन जीवन जगण्यास सुरुवात करू.
लॉकडाऊनमध्ये कुटे ग्रुप आला धावून
आज जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस असल्यामुळे सर्वच बंद होते. परंतु याची अमलबजावणी करणारी यंत्रणा मात्र रस्त्यावर होती. शहरात असणाऱ्या बेघर यासह इतरांना कुटे ग्रुपच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले. यासह पाणी बॉटलची सोय कुटे ग्रुपच्या वतीने करण्यात आली. कुटे ग्रुपच्या या उपक्रमामुळे अनेकांना दिवसभरात जागेवरच अन्न मिळाले. कुटे या उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
चौका-चौकात पोलीस तैनात
जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवार, रविवार दोन दिवस कडक बंद असून याचा आज पहिला दिवस असल्यामुळे शहरातील चौकाचौकात पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रत्येक चौकात येणाऱ्या जाणाऱ्यांना विचारपूस करत त्यांना सोडत होते. जिल्ह्यात चोख नियोजन केल्यामुळे विकेंड लॉकडाऊन हा यशस्वी होताना दिसत आहे. आज सारखाच प्रतिसाद यापुढेही नागरिकांनी द्यावा अशी विनंती प्रशासनाने केली आहे