गेवराई प्रतिनिधी ः- बीड नगर परिषदेची निवडणुक ४० वर्षांच्या हुकूमशाही विरुध्द विस्थापित पोरांची लोकशाही अशी झाली आहे. या निवडणुकीत विस्थापित पोरांच्यामागे खंबीर नेतृत्व देताना आ. विजयसिंह पंडित बीड शहर पिंजून काढत आहेत, प्रचंड प्रतिसाद आणि समर्थन मिळवताना बीडमधील निवडणुक प्रस्थापित क्षीरसागरांच्या तावडीतून बाहेर काढली आहे. जनसामान्य लोकांना सोबत घेऊन राष्ट्रवादीच्या घडीचा ‘विजय’ पंडितांनी दृष्टीक्षेपात आणला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे आणि प्रभाग क्र. २१ च्या उमेदवार सौ. पायल दत्ता जाधव आणि गुंजाळ धर्मराज (बाळासाहेब) लक्ष्मण यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांची प्रचंड जाहिर सभा झाली. नाळवंडी नाका परिसरात झालेल्या सभेला महिला-पुरुष मतदारांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
बीड नगर परिषद निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्यासह प्रभाग क्र.२१ च्या उमेदवार सौ. पायल दत्ता जाधव आणि गुंजाळ धर्मराज (बाळासाहेब) लक्ष्मण तसेच प्रभाग क्र. १० मध्ये सौ. तांदळे उषा गणेश व सौ. शेळके रजनी अक्षय यांच्या प्रचारार्थ आ. विजयसिंह पंडित यांच्या जाहिर सभा झाला. यावेळी शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या डॉ.ज्योती मेटे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप, सावता परिषदेचे कल्याण आखाडे, सुहास पाटील, माजी नगरसेवक शेख निजाम, बप्पासाहेब घुगे, ॲड.राजेंद्र राऊत, पांडुरंग आवारे, सरपंच संघटनेचे कालिदास नवले, अनिल घुमरे, बळीराम गवते यांच्यासह राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसंग्राम चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्ते आणि नागरीकांना वाऱ्यावर सोडून संधी साधूंना बीडची जनता या निवडणुकीत त्यांची जागा दाखवील. शहराचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करून असे सांगून बीड शहरात विरोधक भ्रम निर्माण करून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, बीड शहराच्या उज्वल भविष्यासाठी घडी या चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करून क्षीरसागरांच्या तावडीतून नगर पालिकेची मुक्तता करा असेही ते यावेळी म्हणाले.
क्षीरसागर परिवाराने चाळीस वर्षांत फक्त स्वतःचाच विकास केला, जाती-जातीत भांडणे लावून घर फोडण्याचे काम केले. विकासापासून बीड शहर दूर नेऊन ठेवले, रस्ते नाहीत, नाल्या नाही, प्यायला पाणी मिळत नाही, शहराची पार दुर्गंधी करून टाकली आहे, बीड शहराला स्वच्छ व सुंदर करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवांराना विजयी करून नगर पालिकेवर विकासाचा झेंडा फडकवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बीड शहरात क्षीरसागरांनी फोडा आणि झोडा ही निती वापरून माणसात माणूस ठेवला नाही, घरा-घरांत भांडणे लावण्याचे काम त्यांनी कले. नगर पालिकेच्या सत्तेचा गैरवापर करून लोकांच्या जमीनी लाटल्या. यापूर्वीच्या निवडणुकीत कुणी दाजी म्हणून, कुणी जावई म्हणून मते मागितली तर आता मुजीबभाईची सासू म्हणून आम्ही मते मागितली तर बिघडले कुठे ? असा सवाल करून विरोधकांना त्यांची जागा दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
बीड नगर परिषदेत भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वप्रथम लोकनेते स्व.विनायक मेटे यांनी आवाज उठविला होता. नगरपरिषदेच्या माध्यमातून विरोधकांनी भ्रष्टाचाराचा कळस केला, शहरात विकासाच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, पाणीपुरवठा योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला. या सर्वांचा हिशोब करण्यासाठी आपण एकत्र आले पाहिजे. बीड नगर परिषद भ्रष्टाचार व भयमुक्त करण्यासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांनी बीड शहराला मोकळा श्वास घेण्यासाठी क्षीरसागरांना नगर परिषदेतून हाकला आणि उज्वल भविष्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना मित्रपक्षाच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
ही लढाई लोकशाहीची लढाई आहे, आत्तापर्यंत गोरगरीबांच्या मतांवर निवडून येणारे संधीसाधू धर्मांद शक्तिबरोबर गेले, त्यांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे असे प्रतिपादन भागवत तावरे यांनी केले.
प्रभाग क्र. १० मधील उमेदवार सौ. पायल दत्ता जाधव व गुंजाळ धर्मराज (बाळासाहेब) यांच्या प्रचारार्थ नाळवंडी नाका येथे झालेल्या कॉर्नर सभेचे रुपांतर विराट सभेत झाले. बाळासाहेब गुंजाळ यांना पाठिंबा देण्यासाठी या प्रभागातील महिला-पुरुष मतदारांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही गर्दी विजयाकडे घेऊन जाणारी आहे, ही लाट असून तीला कोणीही रोखू शकत नाही असे यावेळी बोलताना बाळासाहेब गुंजाळ म्हणाले.
![]()
















