सुवर्णकार समाजाकडून 100% बंद
गेवराई प्रतिनिधी : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील कु यज्ञा दुसाने या चार वर्षाच्या चिमुकलीवर अमानुषपणे अत्याचार करून अत्यंत निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ गेवराई सराफा असोसिएशन व सराफा सुवर्णकार फेडरेशन आणि समस्त सुवर्णकार बांधवांच्या वतीने गेवराई तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला. त्यासोबतच आरोपीला तात्काळ कठोर शासन करून फाशी द्यावी या मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेकडो गेवराईकर या मोर्चात सहभागी झाले होते.
मालेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली यात डोंगराळे गावातील यज्ञा दुसाने या चार वर्षाच्या चिमुकलीवर एका नराधमाने पाचवी अत्याचार करून अत्यंत अमानुषपणे तिच्या तोंडावर दगड घालून निर्दयीपणे हत्या केली. एका चिमुकली सोबत असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसी मनोवृत्तीच्या व माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमाला तात्काळ कठोर शासन करून फाशी द्यावी किंवा त्याचा एन्काऊंटर करावा अशी मागणी गेवराई सराफ व सुवर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात आली. या दुर्दैवी घटनेचा निषेध करून दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी गेवराई शहरातील लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्यापासून पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गेवराई तालुका सराफा असोसिएशन सुवर्णकार फेडरेशन बीड जिल्हा यांच्या वतीने तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, अत्याचाराच्या घटनेच्या तपासात कुठलीही त्रुटी न ठेवता योग्य पद्धतीने आणि शीघ्र गतीने तपासून आरोपपत्र त्वरित न्यायालयात दाखल व्हावे. तसेच हा खटला शीघ्रगती विशेष न्यायालयात चालवावा. मुख्य गुन्हेगार व त्यास सहकार्य करणाऱ्याला देखील सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करून कारवाई करावी. अत्याचार झालेल्या चिमुरडीच्या कुटुंबाला शासनातर्फे पोलीस संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देण्यात यावे. त्यासोबतच कोणत्याही महिला वरील अत्याचार प्रकरणी प्रशासनाने अधिक गंभीरपणे दखल घेत कडक आणि धडक कारवाईचे धोरण अमलात आणावी म्हणजे गुन्हेगारांवर वचक बसेल अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी बाळराजे पवार, युधाजित पंडित, महेश दाभाडे, ऋषिकेश बेदरे, अमोल करांडे, दिनकर शिंदे, राजेंद्र मोटे, उद्धव मडके, अभिषेक दाभाडे, राजेश टाक, वैभव शहाणे, रामानंद तपासे, सोपान मडके, मनोज टाक, शिनुभाऊ बेदरे, शामराव उडणसिंह, राधेश्याम येवले, रवी दहिवाळ, डॉ अभिजीत येवले, अनिल आगुंडे,राजू मोटे, महेश सौंदरमल, प्रशांत राख, अतुल हाके, संतोष भोसले, शिवाजी दहिवाळ, सखाहरी अंबिलवादे, माऊली टाक, राधाकिसन मोटे यांच्यासह विविध समाजाचे शेकडो गेवराईकर बांधव सहभागी झाले होते.














