– पोलीस स्टेशन मॅनेज आहेत का ?
– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) कोटी – दोन कोटी रुपये खर्च करून ज्यांनी मंगल कार्यालये बांधली आहेत, ती मंगल कार्यालय लॉक डाऊन मुळे बंद करण्याच्या नोटिसा त्यांना बजावल्या आहेत. अनेकांवर त्याचं कर्जही आहे. मात्र शासनाचे आदेश आणि जिल्हा प्रशासनाचे आदेश पाळत त्यांनी मंगल कार्यालय बंद केली आहेत. पण दुसरीकडे बीड शहराच्या आसपास आणि जिल्ह्यात सर्वदूर जी मोठ-मोठी हॉटेल आहेत, त्या हॉटेलमध्ये लग्न लागत आहेत. त्या ठिकानचे पोलीस झोपले आहेत का ? असा प्रश्न उपस्थित करून जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे तात्काळ लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला वरच्या अधिकाऱ्यांकडे जाण्याचा मार्ग वापरावा लागेल, असा इशारा जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात लोकांची सेवा करण्यासाठी आणि लोकांना मनासारखे लग्न करता यावे, या उद्देशाने अनेक मंगल कार्यालय उभी करण्यात आली आहेत. बीड शहरातील मंगल कार्यालयांनी केलेला खर्च पाहता तो काही कोटींच्या घरात जाऊ शकतो. लॉक डाऊन मुळे ही मंगल कार्यालय सील बंद केली आहेत, त्यांच्यावर पन्नास लोकांचे बंधन घालण्यात आले आहे.
मात्र ही मंगल कार्यालय बंद केल्याचा आनंद घेत काही हॉटेल चालक आपल्या हॉटेलमध्ये लग्न लावत आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी जमा करत आहेत. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा नियम जर केला जात असेल तर ते चुकीचे आहे. यासंदर्भात जन आंदोलनाला तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित तहसीलदार आणि पोलिस ठाण्यात सह ग्रामसेवक, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना देखील आपल्या कार्यक्षेत्रा मध्ये कोठे हॉटेलमध्ये लग्न लागत आहे का ? याची तपासणी करण्यास कायम लक्ष ठेवण्यास सांगावे. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.
याशिवाय जे लोक लग्न लावत आहेत, त्या नवरा-नवरी सह, त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक तसेच हॉटेल चालक आणि मालक यांच्यासह तेथे काम करणाऱ्या वेटर सह बेकायदा लग्न लावणारे तज्ञ ब्राम्हण यांच्यावरही तात्काळ गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. याशिवाय कोरोणा महामारीचे संकट टाळण्यासाठी लोक स्वतःहून पुढे येणार नाहीत. प्रशासन याबाबतीत खबरदारी का घेत नाही ? याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी. संबंधित कार्यक्षेत्रातील सर्व खात्याच्या अधिकाऱ्याला त्या त्या हॉटेलमधून हप्ता जातो का ? याची देखील चौकशी करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
काल एका हॉटेल वर गुन्हा दाखल झाला. मात्र अनेक हॉटेल मालक आणि चालक अजून मोकाट आहेत. सर्व व्यवसाय धंदे कोरोनाच्या संकटामुळे आणि राज्य शासनाच्या आदेशामुळे जिल्हा प्रशासनाने बंद केलेले असताना बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांचे धंदे चालू कसे ? कायदा मोडणाऱ्यांना जरब का घातली जात नाही ? जिल्हा प्रशासन कठोर भूमिका घेऊन गोरगरिबांचे धंदे बंद करते तर मोठ्यांचे धंदे बंद का करत नाही ? गोरगरिबांचा घोडे अडवले जाते आणि मोठ्यांना रान मोकळे सोडले जाते. हा मोठा दुजाभाव आहे.
त्यामुळे त्या-त्या क्षेत्रातील, भागातील जनतेने पुढे यावे. लग्न लागत असेल तर तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस पाटील आणि संबंधित पोलिस स्टेशनला व्हाट्सअप वर अथवा मेसेज टाकून लग्न लागत अथवा लागणार असल्याचे कळवावे. कारवाई न झाल्यास वरिष्ठांशी संपर्क साधावा, कोरोणा महामारी आपल्यामुळे वाढू नये, यासाठी जनतेनेही याकडे लक्ष वेधावे, असे आवाहन देखील केले असून याबाबत जिल्ह्या बाहेरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही बोलणार असल्याचे अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.