बोधेगाव येथील जिल्हा परिषद शाळा, जलजीवन मिशन, हनुमान मंदिर सभागृह यांसह विविध विकास कामांचे धनंजय मुंडेंच्या हस्ते लोकार्पण
माऊली गडदेंनी धनंजय मुंडेंच्या तब्येतीची काळजी व्यक्त करताच सबंध गावकरी भावूक
परळी वैद्यनाथ : – मागील काही महिन्यात एका दुर्दैवी घटनेच्या आडून काहींनी मला टार्गेट केले, या काळात माझा काहीही संबंध नसताना माझी अनेक दिवस मीडिया ट्रायल घडवून आणली गेली. मात्र या पूर्ण काळात माझ्या परळीतील सर्वसामान्य जनता संपूर्ण ताकत आणि आशीर्वादाने माझ्या पाठीशी राहिली. मी अनेक दिवस गप्प राहिलो, दोन वेळा मरता मरता वाचलो तेही याच आशीर्वादाच्या बळावर! माझी माय बाप जनता जे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करून ठाम उभी आहे, त्या बळावर आपण पुन्हा नवी उभारी घेऊ, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील बोधेगाव येथील कार्यक्रमात बोलताना केले.
बोधेगाव येथे नाथ प्रतिष्ठान व जिल्हा परिषद बीड यांच्या एकत्रित निधीतून उभारण्यात आलेल्या सुमारे 77 लक्ष रुपयांच्या जिल्हा परिषद ईमारतीचे उद्घाटन, तसेच सुमारे 75 लाख रुपयांच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण, हनुमान मंदिर येथील सभागृहाचे लोकार्पण, यांसह बोधेगाव येथील विविध विकास कामांचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.
विकास हा आपला पिंड आहे, आज परळी शहराला जोडणारे सर्वच्या सर्व रस्ते चकाचक होत आहेत, ग्रामीण भागातही रस्त्यांसह साठवण तलावांची कामे हाती घेत आहोत, नागपिंपरी येथील सब स्टेशनचे कामही लवकरच सुरू होईल. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांसह आगामी काळात जुन्या थर्मलच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या मेगा सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या भागात रोजगार निर्मिती ही होणार असल्याचे यावेळी पुढे बोलताना श्री मुंडे म्हणाले.
बोधेगाव येथील पुलासह ग्रामस्थांनी केलेल्या विविध मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्या सर्व मागण्या आगामी काळात मान्य केल्या जातील असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
यावेळी माजी आमदार संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, यांसह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान बोधेगाव चे सुपुत्र तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली तात्या गडदे यांनी आपल्या भाषणादरम्यान धनंजय मुंडे यांची तब्येत गेल्या काही दिवसात खराब असून, कार्यकर्ते आणि गावचे लोक म्हणून जेव्हा धनंजय मुंडे यांच्यावर खोटे आरोप होत होते तेव्हा ते बघून आम्हाला अत्यंत वाईट वाटायचे, अजूनही धनंजय मुंडे यांची तब्येत व्यवस्थित नाही आणि ईश्वराकडे आपण सर्वजण मिळून त्यांची तब्येत बरी होण्यासाठी प्रार्थना करू असे बोलताना माऊली यांच्यासह सर्वच ग्रामस्थ भाऊ झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय भाऊ दौंड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड राजेश्वर आबा चव्हाण, शिवाजीराव शिरसाट, बोधेगावच्या सरपंच सुरेखाताई गडदे, बाळासाहेब दोडतले, सूर्यभान मुंडे, वैजनाथराव सोळंके, विष्णुपंत सोळंके, ह भ प आचार्य लक्ष्मण महाराज, श्रीहरी मुंडे, मधुकर आघाव, मोहनराव सोळंके, पिंटू मुंडे, विष्णुपंत देशमुख, बाबासाहेब काळे, बालासाहेब शेप, दत्तात्रय गुट्टे, राजाभाऊ पोळ, शिवदास बिडगर, चंद्रकांत कराड, विकास बिडगर, माऊली मुंडे, कमलाकर बिडगर, जानीमिया कुरेशी, रुस्तुम राव सलगर, लक्ष्मण करणर, सतीश शिरसाठ, अशोक डिगोळे, यशवंत भोसले, संदीप देशमुख, प्रकाश कावळे, विश्वनाथ जानकर, विठ्ठल कोकरे, वसंतराव देशमुख, आयुब भाई शेख, भागवत मुंडे, राजाभाऊ शेप, कांता फड, अरुण मुंडे, सुधीर शिंदे यांसह ग्रामस्थ व परिसरातील नागरिक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
*चौकट*
दरम्यान सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्य सरकारने बीड जिल्ह्यात ५७७ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली असून, त्याचे वितरण सध्या प्रशासनाकडून सुरू आहे. दिवाळीत हे मदतीचे पैसे सामान्य शेतकरी बांधवांना मिळावेत यासाठी शनिवारी रविवारी देखील बँका सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असून त्याप्रमाणे सध्या कार्य सुरू असून, कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्याही प्रकारचा होल्ड लावण्यात येऊ नये अशा ही सूचना दिल्या असल्याचे व त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे धनंजय मुंडे यांनी नमूद केले.
















