– अँड. अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लिमिटेड बीड वर प्रशासक कोण येईल ? यावर अनेकांचे लक्ष होते. नियुक्त झालेले प्रशासक मंडळ चांगल्या पद्धतीने काम करेल असे वाटते. त्यामुळे प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अविनाश पाठक आणि त्यांच्या अन्य चार सहकाऱ्यांचे जन आंदोलनात तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे. आता हे लोक चांगल्या पद्धतीने कामकाज हाताळून बँकेला उभारी देतील, अशी अपेक्षाही जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
जन मानसातील चर्चा पाहता या मंडळावर जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची नियुक्ती लागेल, असे अनेकांना वाटत होते. मात्र प्रत्यक्षात नियुक्त प्रशासकीय मंडळ पाहता सर्व जण कार्यक्षम असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे. त्यामुळे नियुक्ती करताना ती अभ्यास करूनच झालेली आहे, असे दिसते.
यात दोन अधिकारी, एक माजी अधिकारी, ( मात्र मोठ्या पदावर काम केलेले अधिकारी ) एक वकील तर एक चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यामुळे हे सर्व विचारपूर्वक कारभार हाताळतील आणि बँकेच्या कारभाराला न्याय देत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न ही करतील, अशी अपेक्षाही अँड. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
या सगळ्यांनी शेतकरी हिताचे आणि बँक हिताचे निर्णय घेऊन बँक पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला आमचे पूर्ण समर्थन असेल, असेही अँड. देशमुख यांनी म्हटले आहे.