ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत प्रथमच पशूपालकांची एकदिवसीय कार्यशाळा ; योजनेच्या पोर्टलचेही केले उदघाटन
पशूपालनांशी निगडित उद्योगांना शेतीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील ; ना. पंकजाताईंचा पशू पालकांशी संवाद
परळी वैजनाथ । पशूसंवर्धन विभागामार्फत पशूपालन आणि शेतीशी निगडित अनेक चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. विभागांतर्गत सुरु असलेल्या योजनांतून ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजक आणि लखपती बनवायचे आहे. तरुणांना स्वावलंबी बनवणाऱ्या वेगवेगळ्या योजना राबवून ‘ग्रामीण उद्योजक’ अशी ओळख जिल्ह्यातील तरुणांना मिळवून देऊ असा विश्वास राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभाग आणि राष्ट्रीय पशूधन अभियातंर्गत शहरात प्रथमच आज पशूपालकांसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी जिल्ह्यातील पशू पालकांशी संवाद साधताना उदघाटन पर भाषणात ना. पंकजाताई मुंडे बोलत होत्या. पशूसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, पशुसंवर्धनचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल मुकणे, जि.प. चे अतिरिक्त सीईओ वासुदेव सोळंके, प्रादेशिक सह आयुक्त गणेश देशपांडे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी ना. पंकजाताई मुंडे यांनी गोधनाचे औक्षण करून पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. तसेच कार्यक्रमस्थळी पशूपालन आणि शेतीपूरक संकल्पनांची माहिती देणाऱ्या विविध स्टॉल्सना भेट देऊन त्यांची पाहणी करत माहिती जाणून घेतली. याप्रसंगी कार्यशाळेला उपस्थित पशूपालक आणि शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केले.
यापूर्वी मंत्री व जिल्ह्याची पालक मंत्री असताना जिल्हयात ग्रामविकास, जलसंधारण, महिला बालविकास खात्याच्या माध्यमातून अनेक योजना राबविल्या, भरपूर निधी आणला. विकासाची अनेक कामे केली. आता पशूसंवर्धन खाते माझ्याकडे आले आहे. हे खाते तसे श्रीमंत खाते आहे, त्यामुळे यातून चांगली कामे करता येतील. या खात्याच्या विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी ही कार्यशाळा संपूर्ण राज्यात घेत आहोत. तुमचे हाथ मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे. तरुणांनी पशूधनाचे प्रकल्प आणि त्याच्याशी निगडित उद्योग उभारले तर त्यावर पन्नास टक्के सबसिडी मिळते. इतर उद्योगांपेक्षा पशूपालनासारखे उद्योग केले तर मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण उद्योगांसाठी एकात्मिक योजना आणून या उद्योगाला शेतीचा दर्जा मिळवून देणार असल्याचेही ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी सांगितले.
*लखपती उद्योजक संकल्पना*
——-
लखपती दीदी योजने सारख्या लोकाभिमुख संकल्पनेप्रमाणे पशूपालकांना लखपती जोडपे अशी ओळख मिळवून देण्याचा आपला मानस असल्याचेही ना. पंकजाताई यावेळी म्हणाल्या. अशा अनेक योजना आपण पशूसंवर्धन मार्फत राबवत आहोत, या योजनांचा अधिकाधिक फायदा घ्या, कार्यशाळेला विभागाच्या अभ्यासू अधिकाऱ्यांची टीम उपस्थित आहे, त्यांच्याकडून माहिती मिळवून इतरांनाही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन ना. पंकजाताई मुंडे यांनी याप्रसंगी केले.
*ना. पंकजाताईंनी केले तरूण उद्योजकांना बोलते*
——-
पशूसंवर्धन विभागाच्या योजनेचा लाभ घेऊन यश मिळवणारे ग्रामीण भागातील अनेक तरूण उद्योजक या कार्यशाळेस उपस्थित होते, ना. पंकजाताई मुंडे यांनी भाषणाला सुरवात करण्यापूर्वी काही तरूणांना स्वतः व्यासपीठावर बोलवून घेतले व त्यांना आपले अनुभव कथन करण्यास सांगितले. या तरुणांनी सांगितलेले आपले अनुभव उपस्थितांना प्रेरणा देणारे ठरले. पंकजाताईंच्या हस्ते यावेळी या तरूण उद्योजकांचा व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेस जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डाॅ आर डी कदम, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ देशमुख, सह आयुक्त डाॅ पांडे, गट विकास अधिकारी संजय केंद्रे, पशूधन विकास अधिकारी डाॅ प्रकाश आघाव आदी उपस्थित होते.