छाया पंचाळ मृत्यूप्रकरणी डॉ. ज्योती मेटे आक्रमक
जिल्हा शल्यचिकित्सकांची घेतली भेट; प्रसुती विभागाचीही केली पाहणी
बीड प्रतिनिधी : मागील आठवड्याभरात जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही बाब वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी असून सर्वसामान्यासाठी वैद्यकीय सेवेचा आधार असलेल्या शासकीय रुग्णालयात अशी घटना घडल्याने सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज दि १८ रोजी सकाळी शिवसंग्राम अध्यक्ष डॉ. ज्योती विनायकराव मेटे यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देत तेथील प्रसूती विभागाची पाहणी केली आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची भेट घेत दोषीवर वर कारवाई करण्याची मागणी करत रुग्णालय प्रशासन धारेवर धरलं.
छाया गणेश पांचाळ रा. अंबीलवडगाव, ता. बीड यांना जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते.प्रसुती झाल्यानंतर काही वेळातच अचानक रक्तस्रावचा त्रास सुरू झाला. याबाबत नातेवाईकांनी नर्सला माहिती दिली. पण त्यांनी ऐकून न घेता उद्धट भाषा वापरत दुर्लक्ष केले. यानंतर मातेचा मृत्यु झाला. ही घटना जिल्हा रूग्णालयात रविवारी (दि.१३) पहाटे घडली. याप्रकरणाला मयत मातेच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्स जबाबदार असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आणखी दोन महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर मृत्युमुखी पावल्या या घटनेमुळे शिवसंग्राम अध्यक्ष डॉक्टर ज्योती मेटे यांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली यावेळी त्यांनी प्रसूती विभागाची पाहणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला जाब विचारत धारेवर धरले.