निर्घृण हत्येने मन सुन्न झाले ; धडाडीचा कार्यकर्ता गमावल्याचे दुःख
बीड : भाजपचे लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी स्विकारली आहे. आगे यांच्या हत्येने मन सुन्न झाले, एक धडाडीचा कार्यकर्ता मी गमावला आहे अशा शब्दांत त्यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
बाबासाहेब आगे यांची निर्घृण हत्या झाल्याची बातमी जेव्हा कानावर आली, ते ऐकून मन सुन्न झाले. काहीच सुचत नव्हते, त्यामुळे एका दिवसानंतर ना. पंकजाताई मुंडे यांनी या घटनेवर आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. आगे हे भाजपचे धडाडीचे कार्यकर्ते होते, संघाचे संस्कार त्यांचेवर असल्याने प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. माझ्या लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून अतिशय महत्वाची जबाबदारी त्यांनी खूप मेहनतीने पार पाडली. अशा मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे निर्घृण हत्या झाली हे ऐकून मनाला खूप वेदना झाल्या. या घटनेचा मी तीव्र निषेध करते. जिल्हयात आल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या पत्नी व कुटुंबाची भेट घेणार आहे. त्यांच्यावर कोसळलेल्या दुःखात माझा परिवार सहभागी आहे. आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी मी घेणार असून त्यांना सर्वतोपरी मदत करेल असं ना. पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.
••••