प्रधानमंत्री आवास योजना २.० चा आ. विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते प्रारंभ
गेवराई प्रतिनिधी ः- गेवराई शहरात एकही व्यक्ति किंवा कुटूंब बेघर राहू नये याची काळजी घ्या, ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनाही घरकुल मिळेल असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. सर्वांसाठी घर या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना २.० चा गेवराई नगर परिषद अंतर्गत अंमलबजावणीचा शुभारंभ करतेवेळी आ. विजयसिंह पंडित बोलत होते. त्यांच्या शुभहस्ते व्यापारी गाळे धारकांना प्रातिनिधीक स्वरुपात चावी वितरीत करून गाळ्यांचा ताबा देण्यात आला. शहरातील अतिक्रमण धारकांना हक्काचा पीटीआर देणे बाबत आ.पंडित यांनी आढावा घेतला. यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित उपस्थित होते.
गेवराई विधानसभा मतदार संघाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते गेवराई नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना २.० या घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचा शुभारंभ शुक्रवार, दि.४ एप्रिल रोजी करण्यात आला. यावेळी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अमरसिंह पंडित, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नायब तहसिलदार सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहरातील संजयनगर, भिमनगरसह आदी भागातील अतिक्रमण धारकांच्या हक्काच्या पीटीआर संदर्भातील सुरु असलेल्या प्रशासकीय प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. पीटीआर मिळणे बाबत १३४७ अर्जदारांनी पुराव्यासह अर्ज केले असून या महिना अखेर प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र अर्जदारांना हक्काचा पीटीआर मिळणार आहे. त्याचबरोबर गेवराई शहरात सर्वांसाठी घर या संकल्पनेची पारदर्शक अंमलबजावणी करून शहरात एकही कुटूंब बेघर राहणार नाही याची काळजी आपण घेऊ असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी यावेळी केले.
व्यापारी गाळ्यांच्या लिलावानंतर पूर्ण रक्कम भरूनही केवळ राजकीय द्वेषातून मागील अनेक वर्षांपासून व्यापारी गाळ्यांच्या ताब्यापासून वंचित असलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे काम आ. विजयसिंह पंडित यांनी केले. व्यापारी गाळ्याच्या संदर्भात त्यांनी आवश्यक मान्यता शासन स्तरावरून मिळवून आज प्रातिनिधीक स्वरुपात गाळे धारकांना चावी देऊन व्यापारी गाळ्यांचा ताबा आ.पंडित यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गाळे धारकांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. नगर परिषदेत आ. विजयसिंह पंडित यांनी प्रस्तावित शिवस्मारकाची जागा, क्रीडा संकुलातील विकासकामे, भुमिगत गटार योजना, संत नरहरी महाराज मंदिराच्या पीटीआर चा प्रश्न, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे लाभ, दिव्यांग निधीचे वितरण, कोल्हेर रोडवरील व्यापारी गाळ्यांचा प्रश्न, संजयनगर भागातील रहिवाशांचे प्रश्न यांसह विविध विषयांवर चर्चा करून नागरीकांचे प्रश्न सोडविले.
यावेळी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर गेवराई शहराच्या विकासासाठी सुमारे ११ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजुर केला आहे. शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले शेकडो प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे सांगितले. प्रधानमंत्री आवास योजना २.० या घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालांकडे पैसे देण्याची गरज नाही. नगर परिषदेने क्युआर कोड प्रसिध्द केला असून ऑनलाईन अर्ज केल्यास कोणतीही अडचण येणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त गरजु नागरीकांनी या घरकुल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. यावेळी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.