प्रशासनाशी संबंधित आणि विकासाचे मुद्दे केले उपस्थित
बीड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विकास कामांची तसेच शासकीय योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि.२) रोजी पार पडली. या बैठकीत आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न ना.अजित दादांसमोर मांडले. यासोबतच प्रशासनाच्या संबंधित असलेले अनेक मुद्दे आ.क्षीरसागर यांनी उपस्थित केले.
बीड जिल्ह्यातील विकास कामे व शासकीय योजनांची जिल्हास्तरीय आढावा बैठक बुधवारी (दि.२) रोजी ना.अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ना.अजितदादांनी जिल्ह्यात पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. याप्रसंगी बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे असलेले अनेक प्रश्न मंत्री महोदयांसमोर मांडले.
आ.संदीप क्षीरसागर यांनी मांडलेले मुद्दे (अतिमहत्वाचे)
• एमआयडीसी भागात पोलीस चौकी उभारणी करणे.
• नरेगा अंतर्गत जी अनावश्यक कामे झाली आहेत त्यातील कुशलची कामे प्रमाणात झालेली नाहीत. अनावश्यक मागणी केल्याने आज रोजी जी कामे आवश्यक आहेत ती करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
• राष्ट्रीय महामार्ग क्र.361 एफ खरवंडी ते नवगण राजुरी रस्त्यावरील मौजे नवगण राजुरी, काटवटवाडी येथील संपादित प्रकरणात सुधारित निवाडा व निधी मागणी.
• खरवंडी-ब्रह्मनाथ येळंब-आर्वी-खालापुरी-नवगण राजुरी राष्ट्रीय महामार्ग क्र.361 एफ ची सुधारणा करण्याबाबतचे काम गेल्या सात वर्षांपासून अपुर्ण आहे.
• बीड शहरातील जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक नाली बांधकाम करण्याबाबत मागणी केली. त्यास मा. मंत्री महोदयांनी सकारात्मकता दर्शविली.
• बीड नगर परिषद ने ओपन स्पेसच्या जागा अनियमितता करून बोगस वाटप केले आहेत. गुंठेवारी बोगस केलेली आहे. नगर परिषदेच्या फंडातून दुबार व निकृष्ट दर्जाची अनेक कामे केलेली आहेत. या सर्व प्रकरणातील मुळ संचीका नगर परिषद, बीड येथून गायब आहेत. तसेच नगरपरिषद प्रशासन बीड शहरातील स्वच्छता व पाणी पुरवठ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
टुकूर साठवण तलावाऐवजी कोल्हापुरी बंधार्यांसाठी केली आग्रही मागणी
खांडेपारगाव येथील मंजूर टुकूर साठवण तलावाच्य ऐवजी बीड तालुक्यात प्रस्तावित ठिकाणी नऊ कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी आ.संदीप क्षीरसागर गेल्या अनेक काळापासून शासन, प्रशासन स्तरावर पाठपुरावा करत आहेत. बीड येथे पालकमंत्री ना. अजितदादा पवार आले असता यावेळीही याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी या भागातील नागरिकांसह आग्रही मागणी केली. यावेळी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळीच्या प्रतिनिधींसह आ.क्षीरसागरांनी ना.अजित दादांना याबाबत निवेदन दिले.