रेल्वे मंत्री व बोर्डाचे चेअरमन यांची नवी दिल्लीत भेट
बीड: बीड ते अहिल्यानगर या रेल्वे मार्गावर रेल्वे सुरक्षा चाचणी झाली असून या मार्गावर प्रतितास ११० किलोमीटर इतक्या वेगाने रेल्वे नेण्यासाठी रेल्वे सेफ्टी बोर्डाने संमती दिली आहे. यामुळे आता बीड-अहिल्यानगर-मुंबई अशी रेल्वे सुरू करावी, असा लोकाभिमुख प्रस्ताव खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे बोर्डचे चेअरमन सतिषकुमार यांच्याकडे दि.२६ रोजी मांडला.
नवी दिल्ली येथील संसद कार्यालयामधे रेल्वेमंत्री तसेच रेलभवन येथे रेल्वे बोर्डचे चेअरमन यांची खा.बजरंग सोनवणे यांनी भेट घेतली. बीडकरांसाठी महत्त्वाच्या मागणीमधे पुणे आणि मुंबई येथे जाण्यासाठी सोय उपलब्ध होणे ही महत्वाची मागणी आहे.बीड ते अहिल्यानगर प्रवासासाठी साधारणत: दोन तास लागतात. ज्यामध्ये अंमळनेर, आष्टी असे दोन थांबे प्रस्तावित करता येतील. ही रेल्वे दोन तासांमध्ये अहिल्यानगर स्टेशनवर पोहोचू शकेल. रात्री शिर्डी दादर एक्सप्रेस तेथून जाते ती अहिल्यानगर दौंड पुणे लोणावळा कर्जत कल्याण ठाणे दादर अशी प्रवास करते. एक १० डब्यांची रेल्वे बीड ते मुंबई किंवा बीड ते दादर अशी सोडता येऊ शकते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ही रेल्वे पोहोचण्यासाठी त्या मार्गावर कोणताही अडथळा येणार नाही. तसेच बीड येथून फक्त दहा कोच यामध्ये दोन अनारक्षित दोन वातानुकूलित आणि सहा बिगर वातानुकूलित शायिका अशा जर नियोजित केल्या तर हे दहा डबे शिर्डी दादर एक्सप्रेसला जोडता येतील, त्यामुळे बीड ते पुणे व बीड ते मुंबई असे दळणवळण होऊ शकेल. प्रस्तावाला रेल्वेच्या स्तरावर काहीही अडथळा येणार नाही. त्यांची वाहतूक वाढेल व भारमान सुद्धा चांगले मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच बीड-आहिल्यानगर-पुणे अशी इंटरसिटी नियमीत रेल सुरु करता येईल, असा प्रस्ताव मांडला. यावेळी चेअरमन सतिषकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
बार्शी नाका स्थानकाचाही मांडला मुद्दा
अहिल्यानगर-बीड अशी रेल्वेची चाचणी झाली असून पालवन परिसरात रेल्वेस्टेशन करण्यात आलेले आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी बार्शी नाका येथे एक अतिरिक्त रेल्वे स्थानक करुन तेथे थांबा देण्याची मागणी केलेली आहे. त्यानूसार बार्शी नाका येथील स्थानकही पुर्ण करून कार्यान्वीत करावे, असा मुद्दाही खा.बजरंग सोनवणे यांनी आवर्जुन मांडला.