पंचायतराज समितीवर झाली निवड
मुंबई प्रतिनिधी – बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांची महाराष्ट्र विधीमंडळाच्या पंचायतराज या महत्त्वपूर्ण समितीवर निवड झाली आहे. गुरूवारी (दि.२७) रोजी विधीमंडळ सचिवालयाकडून ही निवड जाहीर करण्यात आली असून, त्यांच्या या नव्या जबाबदारीबद्दल राजकीय वर्तुळातून कौतुक होत आहे.
आ. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार असून, बीड जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांना विधानसभेत प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी ते ओळखले जातात. आमदार होण्याअगोदर आ.संदीप क्षीरसागर यांनी पाच वर्षे पंचायत समिती सभापती, अडीच वर्षे जिल्हा परिषद सदस्य व पाच वर्षे जिल्हा परिषद सभापती असे एकूण साडेबारा वर्षे पंचायत राज व्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष काम केले आहे. त्यामुळे पंचायत राज व्यवस्थेचा त्यांना सखोल अभ्यास आहे. आता पंयायतराज समितीवर त्यांची निवड झाल्याने त्यांना विधीमंडळाच्या कामकाजातही अधिक सक्रिय सहभाग घेता येणार आहे. ही समिती राज्यातील पंचायत राज विभागाच्या महत्त्वाच्या धोरणांवर देखरेख ठेवून सरकारला शिफारशी करण्याचे काम करते. आ. क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभेत अनेकदा बीड जिल्ह्यातील पाणीटंचाई, ग्रामीण विकास आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य केले आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे त्यांना समितीच्या माध्यमातून राज्यस्तरीय धोरणांवर प्रभाव टाकण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी- आ.संदीप क्षीरसागर
विधीमंडळाच्या पंचायत राज समितीमध्ये निवड ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. मी माझ्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेच्या हितासाठी पंचायत राज समितीच्या माध्यमातून काम करेन. बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे, निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना आ. क्षीरसागर यांनी म्हटले.