आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीला यश
बीड प्रतिनिधी : आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड येथे नवीन विमानतळ उभारणीची मागणी केली होती, त्यांच्या मागणीला यश आले असून उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीचा उल्लेख करून विधानसभेत बीड येथे नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार असून जिल्ह्यातील उद्योग वाढीला मोठा फायदा होणार आहे.
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. विजयसिंह पंडित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवत विविध विषयांची प्रभावी मांडणी केली आहे. अर्थमंत्री ना अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चे दरम्यान आ. विजयसिंह पंडित यांनी बीड जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन विमानतळ उभारणीची मागणी केली होती. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी आ. विजयसिंह पंडित यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून बीड येथे नवीन विमानतळ उभारणीसाठी कार्यवाही सुरू करत असल्याची घोषणा केली. यामुळे बीड येथे नवीन विमानतळ उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. बीड जिल्हाधिकारी यांनी याबाबतच प्रस्ताव पाठवला असून त्यावर भूसंपादन आणि इतर सोपस्कार व्हावे तसेच इतर बाबीवर कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे असे सांगून बीड येथे कमीत कमी तीन किलोमीटर लांबीची धावपट्टी उभारली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला विकासाच्या टप्प्यात येता येणार आहे. पर्यटन आणि इतर व्यवसायाला चालना मिळेल असेही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान विजयसिंह पंडित यांनी विधानसभा सदस्य झाल्यानंतर आपल्या भागातील विकासाचे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत मांडले. जलसंधारण, कृषी याबरोबरच विमानतळ उभा करण्याची मागणी करून त्यांनी आपल्या भविष्यवेधी नेतृत्वाची झलक दाखवली. आ. विजयसिंह पंडित यांनी बीडच्या विमानतळाचा प्रश्न निकाली काढल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व स्तरातून त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.