शहरातील पाणीपुरवठा, बंधारा, टुकूर प्रकल्पाबाबत केल्या मागण्या
नागपूर :- बीड मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकांच्या दृष्टीने उपयुक्त परंतु प्रलंबित असलेले प्रश्न आ.संदीप क्षीरसागर यांनी बुधवारी (दि.१८) रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले. बीड शहरातील अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न, खांडेपारगाव येथील टुकूर साठवण तलाव प्रश्न आणि शहरातील बिंदुसरा नदीवर बंधारा कम पूल बांधणी करणे हे महत्वाचे विषय मार्गी लावण्याबाबतची मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी सभागृहात औचित्याच्या मुद्यांद्वारे केली.
*आ.संदीप क्षीरसागर केलेल्या मागण्या*
*-बीड शहर पाणीपुरवठा*
बीड शहराची लोकसंख्या ३ लाख आहे. बीड शहरात सध्या कार्यरत असलेली पाणीपुरवठा योजनेची यंत्रणा ही अनेक वर्षांपूर्वीची आहे. त्यामुळे बीड शहराला पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही. परंतु बीड शहराला पाणी न मिळण्याचे नेमके हे नाही, बीड शहराच्या आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करण्यासाठी अटल अमृत योजनेचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु बीड नगरपालिकेकडे महावितरण कंपनीचे ३६ कोटी रुपये इतकी वीजबिल थकबाकी असल्याने या योजनेसाठी महावितरण कडून नवीन कनेक्शन दिले जात नाही आणि परिणामी बीड शहराला १५ ते २० दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो, तेही पाणीसाठा मुबलक असताना आणि यंत्रणा तयार असताना. त्यामुळे शासनाने नगरपालिकेकडे असलेले थकीत वीजबिल भरण्यासाठी विशेषबाब म्हणून निधीची तरतूद करावी.
*-बिंदुसरा नदीवरील बंधारा कम पूल*
बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण हे अनियमित असते. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशी परिस्थिती बीडमध्ये असते. दुष्काळात तर साहजिकच पाणीपातळी खालावते आणि शहरातील व परिसरातील विहीर आणि बोअर कोरड्या पडतात. परंतु मुबलक पाऊस पडल्यानंतर देखील पाणी अडविण्यात नसल्याने त्या पाण्याचा उपयोग होत नाही. शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीवर पूल कम बंधारा बांधण्याबात गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा आणि मागणी सुरू आहे. हा पूल कम बंधारा बांधल्यानंतर एखाद्या वेळी पाऊस जरी पडला नाही, तरीदेखील अडविलेल्या पाण्यामुळे ५ किलोमीटर पर्यंतच्या परिसरातील विहीरींना आणि बोअरला पाणीसाठा उपलब्ध राहील. या बंधार्याची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या महत्वाच्या कामाला शासनाने मंजूरी आणि निधी उपलब्ध करून द्यावा.
*-टुकूर साठवण तलाव*
बीड मतदारसंघात टुकूर साठवण तलाव प्रकल्पाची २००३ साली मंजुरी झालेली आहे. परंतु या परिसरातील गावांचा या प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध असल्यामुळे हा प्रकल्प इतक्या वर्षांपासून रखडलेला आहे. यातून मार्ग म्हणून साठवण तलावाच्या ऐवजी नदीवर ४ निम्न पातळी बंधारे जर बांधले तर तितक्याच क्षमतेची पाणी साठवणूक होणार आहे. यासोबतच तलाव प्रकल्पाच्या तुलनेत अर्ध्या निधीतच हे काम होईल त्यामुळे शासनाचे पैसे वाचतील आणि महत्वाचा प्रश्न मार्गी लागेल. असे आ.संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.