पवनचक्की संदर्भाने होत असलेल्या बेकायदेशीर बाबींवरही आळा घालण्याची मागणी
बीड प्रतिनिधी :- पवनचक्की धारकांकडून बीड जिल्ह्यात अनेक बेकायदेशीर गैरप्रकार होत आहेत. पवनचक्की संदर्भाने शेतकरी व नागरिक यांना धमकावणे, गुंडगिरी, फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यातच पवनचक्कीच्याच संदर्भातील प्रकरणातून केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच असलेले स्व.संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाली आहे. या प्रकरणात शासन आणि प्रशासनाने स्व.संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना संरक्षण आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
बीड विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण बीड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून पवनचक्की कंपन्या कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या पवनचक्की कंपन्यांच्या मालक व हस्तकांकडून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना धमकावणे, फसवणे, मारहाण करणे, जमिनी बळकावणे, पवनचक्की चे काम करताना शेतातील पिकांचे नुकसान करणे असे अनेक प्रकार मागील काळात घडले आहेत. यासोबतच पवनचक्कीच्या कामात शेतकऱ्यांची जमिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर शेतकऱ्यांना ठरलेल्या रकमेप्रमाणे देयके न देणे असेही गैरप्रकार पवनचक्की कंपन्यांकडून व त्यांच्या हस्तकांकडून घडलेले आहेत. आता तर या लोकांची थेट हत्या करण्यापर्यंत मजल गेली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्व.संतोष देशमुख यांची निघृण हत्या झाल्याचा प्रकार सोमवार (दि.९) रोजी बीड जिल्ह्यात घडला आहे. हा प्रकार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरश: वाभाडे काढल्यासारखा आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी. यासोबतच बीड मतदारसंघ क्षेत्रातील चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश जिल्हा परिषद गटातील बहुतांश गावात देखील पवनचक्की मालक व त्यांच्या हस्तकांकडून वारंवार असे प्रकार घडले आहेत. त्यातून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पवनचक्की संदर्भाने बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था संदर्भाने मोठा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत शासन आणि प्रशासनाने योग्य पाऊले घेऊन कारवाई करावी. यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी निष्पक्ष पवित्रा घ्यावा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. यासंदर्भात आ.क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण चे महासंचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.