गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बदामराव पंडित हे मतदार संघातल्या जनतेशी प्रामाणिक असून, गद्दारांनी पक्ष फोडला तेव्हा शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत सुद्धा ते एकनिष्ठ राहिले. अशा प्रामाणिक माणसाला विधानसभेत आमदार म्हणून पाठवा असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक माजी आमदार सुनील धांडे यांनी केले आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांच्या प्रचारासाठी आणि मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय व्हावा यासाठी गेवराई विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक माजी आमदार सुनील धांडे हे मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शिवसैनिकांच्या तसेच मतदारांच्या भेटी घेत आहेत. यावेळी शिवसैनिकांशी संवाद साधताना माजी आमदार सुनील धांडे म्हणाले की, प्रत्येक शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून गावातल्या प्रत्येक गल्लीकडे लक्ष द्यावे. कारण विरोधक हे कपटी आणि खोडसाळ वृत्तीचे आहेत. ते प्रामाणिकपणे काम करून कधीच निवडून येऊ शकत नाहीत, ही खात्री त्यांनाही आहे. त्यामुळे ऐनवेळी जनतेला दिशाभूल करून किंवा लालच आणि भुलथापा देऊन निवडून येण्याचेच त्यांचे प्रयत्न असतात. महायुती ही जनतेसोबत गद्दारी करणाऱ्या भाजपाने तोडफोड करून, शिवसेना आणि राष्ट्रवादी मधून एकत्र आणलेल्या गद्दारांची आहे. महागाई वाढवून शेतकऱ्यांच्या मालाला भाव न देणाऱ्या आणि बेरोजगारांच्याही हाताला काम न देणाऱ्या, घटनाबाह्य सरकार स्थापन करणाऱ्या या महायुतीला आपल्या मतदारसंघातून हद्दपार करा. गेवराई तालुक्यात महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमदार व्हायचं आहे तर दुसऱ्या उमेदवारांना महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोकप्रिय असलेल्या उमेदवार बदामराव पंडित यांना पडणाऱ्या मतांची विभागणी करायची आहे. तालुक्यातल्या जागरूक मतदाराने हे ओळखलेले आहे. त्यामुळे महायुतीचे मनसुबे उधळून लावा आणि खऱ्या अर्थाने गोरगरीब जनतेशी प्रामाणिक असलेल्या, त्यासोबतच शिवसेना पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ राहिलेल्या बदामराव पंडित यांना मशाल जीवनात समोरचे बटन दाबून विधानसभेत भरघोस मताने आमदार म्हणून पाठवा. बदामराव आमदार होणे हे गोरगरीब आणि सामान्य माणसासाठी गरजेचे असल्याचेही माजी आमदार सुनील धांडे म्हणाले.
याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा समन्वयक युद्धाजित पंडित, उपजिल्हाप्रमुख महादेव औटी, उपजिल्हाप्रमुख बबलू खराडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख शेख सिराज, तालुकाप्रमुख अजय दाभाडे, युवा सेना तालुका प्रमुख गोविंद दाभाडे, माजी उपसभापती भीष्माचार्य दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष अमोल करांडे, किसान सेना तालुकाप्रमुख सतीश सपकाळ, अल्पसंख्यांक सेल तालुकाप्रमुख तय्यब पठाण, शिवसेना शहर प्रमुख साद सालमिन चाऊस, युवा सेना शहर प्रमुख शेख शहेदाद आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.