शेतकर्याच्या लेकीचे जागोजागी उत्स्फूर्त स्वागत
गेवराई : गेवराई मतदार संघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पुजाताई मोरे यांना जनतेचा अत्यंत उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून, गावागावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे. शेतकर्याची लेक आमदारकीला उभी असून, तिला मतदानरूपी आशीर्वाद देणे हे आपले कर्तव्य आहे अशी भावना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या मनामध्ये रुजली आहे. गावातील तरुण, महिला, आबालवृद्ध यांनी पूजाताई मोरे यांना साथ देत यंदा परिवर्तन घडविण्याचा संकल्प केला असल्याचे दिसत आहे.
विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होत आहे. मतदानासाठी आता अवघे आठ दिवस उरल्याने त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. गेवराई मतदार संघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पुजा मोरे सध्या प्रत्येक गावात जाऊन ‘डोअर टू डोअर’ प्रचार करीत आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावाला त्यांनी भेट दिली असून, त्यांचे सर्वत्र भरभरून स्वागत करण्यात येत आहे. पूजाताई मोरे या संघर्षशील व्यक्तिमत्व असलेल्या उमेदवार आहेत. तालुक्यातील शेतकरी आणि कष्टकरी यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी, पूजाताई मोरे यांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. तालुक्याचा विकास होण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात. आपल्या हक्कासाठी लढणारी आपलीच शेतकर्याची लेक पुढे आली असल्याने, ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. म्हणूनच प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात ग्रामस्थांकडून पुजाताई मोरे यांचे अत्यंत उत्साहात स्वागत केले जात आहे. दिवस असो की रात्र असो पूजाताई मोरे येणार असे समजल्यानंतर संपूर्ण गाव त्या ठिकाणी जमा होत असून, गावातून त्यांची आल्याबरोबर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. पूजाताई यांना जातीभेद, धर्मभेद, उच नीच असे सगळे भेदभाव विसरून सर्वजण पाठिंबा देताना दिसत आहेत. वास्तविक परिस्थिती बघितली तर ग्रामीण भागातील जनता पवार, पंडिताच्या कारभाराला वैतागली असल्याचे दिसते. एवढ्या वर्षात तालुक्याचा विकास झाला नाही, लोकांना सुखाचे दिवस आले नाही, त्या त्या परिसरातील अनेक प्रश्न तसेच पडून आहेत. ते सोडविणे ही आमदाराची जबाबदारी असतानाही ते काम झाले नाही. यामुळे जनताच आता या प्रस्थापितांना वैतागली असून, त्यांनी यंदा तालुक्यात परिवर्तन करण्याचा निश्चय केला आहे. आतापर्यंत योग्य पर्याय मिळत नसल्याने लोकांकडे मार्ग शिल्लक नव्हता, मात्र पूजाताई मोरे यांच्या माध्यमातून योग्य पर्याय लोकांच्या समोर असल्याने, ते आता परिवर्तनच करणार असे दिसत आहे. पवार पंडितांच्या विरोधात जात ते पूजाताई मोरे यांना उघडपणे साथ देताना दिसत आहेत. लोकांचा हाच उत्साह भारावून टाकणारा असून, यंदा प्रस्थापित घराणे तडीपार होणार असे निश्चितपणे मानले जात आहे. पूजाताई मोरे यांनी सुद्धा ग्रामस्थांना आपल्या एका बोटामध्ये ताकत असून, त्या बोटाचा योग्य वेळी योग्य वापर केला तर परिवर्तन होऊ शकते असे आवाहन करताना त्या दिसत आहेत.
चौकट –
*ग्रामस्थांच्या स्वागताने पूजाताई भारावल्या*
पूजाताई मोरे या मतदार संघातील प्रत्येक गावाला भेटी देत आहेत आणि गावकर्याकडून त्यांचे अत्यंत उत्साहात स्वागत होत आहे. रात्र असो की दिवस प्रत्येक ठिकाणी गावकरी उत्साहाने पूजा ताईंचे स्वागत करताना दिसतात. तालुक्यातील मनुबाई जवळा या ठिकाणच्या ग्रामस्थांनी रात्रीची वेळ असूनही संपूर्ण गावाने पूजाताईंची गावातून मिरवणूक काढली आणि घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सोबतच फटाक्यांची आतिश बाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या या स्वागताने पूजाताई यावेळी भारावून गेल्याचे दिसले. त्यांनी गावकर्यांना हात जोडीत उत्स्फूर्त स्वागताबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रत्येक ठिकाणी गावातील लोक आपलीच लेक म्हणून पूजाताईंना आशीर्वाद देताना दिसत आहेत.
चौकट –
*वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून*
*तुमच्यासाठी लढेल- पूजाताई मोरे*
पूजाताई मोरे या ग्रामस्थांना वास्तविक परिस्थितीचे अत्यंत समर्पक शब्दांमध्ये जाणीव करून देतात. शेतकरी, कष्टकरी, ग्रामस्थांचे हक्क आणि त्यांची होणारी फसवणूक याबाबत त्या प्रत्येक गावाला जागृत करत आहेत. पूजाताई यांची भूमिका आता गावकर्यांना सुद्धा समजून आली असून यामुळेच ते एक मुखाने पुजाताई यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. पूजाताई मोरे यांनी सुद्धा ग्रामस्थांना आश्वासित करताना, आपण तुमच्यासाठी वैयक्तिक आयुष्याचा त्याग करून सदैव तुमच्या हक्कासाठी लढेन, असे वचन दिले आहे. पूजाताई यांच्या या भूमिकेने गावकरी अक्षरशः भारावून गेले आहेत.